Agriculture News : मिरचीच्या उत्पादनात वाढ, धर्माबादमध्ये मोठी आवक; दराचा 'ठसका' कायम
Agriculture News : मिरचीचे आगार म्हणून प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील नांदेड (Nanded) जिल्ह्यातील धर्माबादमध्ये (Dharmabad) यंदा मिरचीचे पीक चांगले आले आहे.
Agriculture News : यावर्षी मिरचीच्या उत्पादनात (chilli production) चांगली वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. उत्पादनात वाढ झाली असली तरी दर कायम असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मिरचीचे आगार म्हणून प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील नांदेड (Nanded) जिल्ह्यातील धर्माबादमध्ये (Dharmabad) यंदा मिरचीचे पीक चांगले आले आहे. त्यामुळं शेतकरी मिरची बाहरेच्या ठिकाणी पाठवण्यावर भर देत आहेत. मिरचीची आवक वाढली असली तरी दराचा ठसका कायम आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद हे मिरची, हळद आणि धने पावडरच्या बाजारपेठेसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी धर्माबादसह हैदराबाद, खम्मम, वरंगल, ब्याडगी (कर्नाटक) , सोलापूर, गुलबर्गा या ठिकाणांवरून मिरची विक्रीसाठी येते. ग्राहक देखील मिरची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात. तसेच धर्माबादची गावरानी आणि तेजा या प्रसिध्द मिरच्या असून त्यांना अधिक मागणी असते.
मिरचीबरोबर धन्याच्या उत्पादनातही वाढ
जानेवारी महिन्यापासून लाल मिरची बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी मिरचीचे पीक चांगले आले आहे. धर्माबादमध्ये सध्या 400 ते 500 थैल्या रोज मिरची येत आहे. मार्चमध्ये आणखी आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच धने एक हजार ते दोन हजार थैल्यांची रोज आवक होत आहे. धन्याचे उत्पादन वाढल्याने गतवर्षीपेक्षा यंदा दर कमी झाले आहेत. गतवर्षी 120 रुपये किलोवरून 70 रुपये किलोवर आले आहेत.
तेजा मिरचीला अधिक मागणी
दरम्यान, तेजा मिरचीला अधिक मागणी असून, या मिरचीपासून तेल तयार करण्यात येते. तेलंगणातील खंम्मम येथे याची फॅक्ट्री आहे. त्यामुळं बाहेर पाठवण्यावर भर दिला जात आहे. उत्पादन वाढले तरी, मिरचीचे दर हे मागील वर्षाप्रमाणेच स्थिर आहेत. कमी होण्याची शक्यता कमी आहे, असे धर्माबाद येथील मिरचीचे व्यापारी तथा इंडस्ट्रीएल एरियाचे चेअरमन शेख अमिरोददीन शेख महियोददीन यांनी सांगितले.
सध्याचे मिरचीचे दर (क्विंटलमध्ये)
ब्याडगी -35 ते 40 हजार, तेजा- 18 ते 20 हजार, गुंटूर - 18 ते 19 हजार, फटकी - 10 ते 12 हजार, 273- 17 ते 18 हजार, डयुन्युडिलक्स - 18 ते 19 हजार, गावरानी (धर्माबाद) - 25 ते 30 हजार, वंडरहार्ट- 19 ते 20 हजार तसेच हळद - 6 ते 7 हजार, धने 6 ते 8 हजार
तेलंगणासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही वाढली आवक
तेलंगणातील खंम्मम, आंध्रा प्रदेशातील गुंटूर, वरंगल आणि कर्नाटकमधील ब्याडगी येथील मिरचीची बाजारपेठ प्रसिध्द आहे. याठिकाणीही सध्या आवक वाढली आहे. दररोज गुंटूरमध्ये एक लाख 40 हजार थैल्या, वरंगलमध्ये 75 हजार थैल्या, खंम्मममध्ये 40 हजार थैल्या, ब्याडगीमध्ये 70 हजार ते एक लाखपर्यंत थैल्यांची आवक होत आहे, असे व्यापारी शेख अमिरोददीन शेख महियोददीन यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या: