Nandurbar News : नंदुरबार मिरचीची बाजारपेठ ढासळली, लाखोंचा खर्च मात्र हजारो क्विंटल मिरची पाण्यात
Nandurbar News : नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने हजारो क्विंटल मिरची पिकाचे नुकसान झाले आहे.
Nandurbar News : गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार (Nandurbar) जिल्हाभरात अवकाळी पाऊस होत असून याचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिरची (Chilly Farmers) व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. झालेल्या अवकाळी पावसात (Unseasonal Rain) 25 हजार क्विंटल मिरची ओली झाल्याचा अंदाज बाजार समिती व्यक्त करत आहे तर दुसरीकडे ढगाळ वातावरणाचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही बसत आहे ढगाळ वातावरणामुळे मिरची वरील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Bajar Samiti) ओळख आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून खराब असलेल्या वातावरणाचा नंदुरबार बाजार समितीतील मिरची व्यापारी आणि शेतकरी यांना मोठा फटका बसत आहे. नंदुरबार बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली 25000 क्विंटल पेक्षा जास्त ओली लाल मिरची सुकवण्यासाठी पथार्यांवर टाकली होती. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पाण्यात सापडून दहा ते पंधरा टक्के मिरची खराब होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता बाजार समितीने व्यक्त केली आहे.
नंदुरबार येथील मिरची व्यापारी रवी कोठारी म्हणाले कि अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल यांचा मोठा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून यावर्षी शेतकऱ्यांना दर चांगला मिळत असला तरी मिरचीचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. मायबाप सरकारने नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा विचार करून त्यांना भरपाई द्यावी हीच अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यात वातावरणात होणाऱ्या बदलाचा सर्वाधिक फटका मिरची व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसत असल्याचे समोर आले आहे. वारंवार होणाऱ्या ढगाळ वातावरण आणि दोन महिन्यात दोनदा अवकाळी पावसाचा बसलेला माऱ्यामुळे मिरची काळी पडणे आणि मिरची पिकावर येणाऱ्या विविध रोगांमुळे उत्पादनात घट आले आहे. तसेच अवकाळी पावसात सापडलेल्या मिरचीची पतवारी कमी झाल्याने तिला मिळणारा दरही कमी झाला आहे. आवक कमी असल्याने भाव चांगला मिळत असला तरी दोन महिन्यात दोन वेळा झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे मिरचीचे उत्पादन प्रचंड घटल्याचे व्यापारी सांगतात. ढगाळ वातावरण झाल्यानंतर सुकवण्यासाठी टाकलेली हजारो क्विंटल मिरची गोळा करून तिच्यावर झाकण्यासाठी प्लास्टिक टाकण्याची मोठी कसरत व्यापाऱ्यांना करावी लागते त्यात मजूर टंचाई आणि अनेक समस्या असल्याने मिरची व्यापारी हवाल दिल झाल्याचे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर म्हणाले.
विविध रोगांचा मिरचीवर प्रादुर्भाव
ऑक्टोबर महिन्यापासून मिरचीच्या हंगामाला सुरुवात झाली असली तरीही दुसऱ्यांदा अवकाळी हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी मिरचीवर चुरडा, मुरडा, बोकड्या मिरचीवर अनेक प्रकारचे रोग आल्यामुळं मिरची पिकात मोठ्या प्रमाणावर घट आल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम मिरची विक्रीवर होताना दिसत आहे. मिरचीचा हंगाम जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आलेला होता. मात्र, पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी हजारो क्विंटल मिरची पाण्यात गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.