Pik Vima : पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांचा सहभाग, 31 जुलैपर्यंत योजनेत सहभागी होण्याचं कृषी आयुक्तांचं आवाहन
पीक विमा (Pik Vima) योजनेमध्ये आजपर्यंत 66 लाख 5 हजार शेतकऱ्यांनी (Farmers) सहभाग नोंदवला असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिली.
![Pik Vima : पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांचा सहभाग, 31 जुलैपर्यंत योजनेत सहभागी होण्याचं कृषी आयुक्तांचं आवाहन 66 lakh farmers participated in crop insurance scheme says Agriculture Commissioner Sunil Chavan Pik Vima : पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांचा सहभाग, 31 जुलैपर्यंत योजनेत सहभागी होण्याचं कृषी आयुक्तांचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/e2241e3cb91c2c5f6431159d5e36c1df1689561828655785_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pik Vima : राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा (Pik Vima) योजनेमध्ये आजपर्यंत 66 लाख 5 हजार शेतकऱ्यांनी (Farmers) सहभाग नोंदवला असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलैपर्यंतची आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावं असं आवाहनही कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी केले आहे.
52 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्केच पाऊस
राज्यात विमा संरक्षित क्षेत्र 42.30 लाख हेक्टर आहे. राज्याचे 1 ते 17 जुलैपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान 389.1 मिमी असून यावर्षी आत्तापर्यंत 294.60 मिमी म्हणजे सरासरीच्या 76 टक्के पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत राज्यामध्ये 52 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्के, 136 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के तर 109 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. तर 58 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याची माहिती कृषी आयुक्त चव्हाण यांनी दिली
कापूस आणि सोयाबीनची 83 टक्के क्षेत्रावर पेरणी
खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून आजपर्यंत 88.44 लाख हेक्टरवर (62 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी आयुक्तांनी दिली. कापूस व सोयाबीनची 83 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग आला आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरु झाली आहेत.
गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत 100 टक्के बियाणांचा पुरवठा
राज्यात गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत 100 टक्के बियाणांचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध 48.34 लाख मे. टन खतापैकी 21.31 लाख मे. टन खतांची विक्री झाली आहे. तर 27.03 लाख मे. टन खत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी खत खरेदीची पावती आणि टॅग जपून ठेवावेत. कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 182334000 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, त्याठिकाणी शेती कामांना वेग आला आहे. मात्र, अन्य काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Nashik News: काय सांगता! एका रुपयात भात पिकाला 49 हजार रुपयांचं संरक्षण, असा करा पीक विमा अर्ज?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)