(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Britney Spears : गेल्या 12 वर्षांत मला खूप त्रास, माझ्या वडिलांना तुरुंगातच डांबायला हवं: पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्स
Britney Spears conservatorship case : गेल्या 12 वर्षात मला खूप त्रास झाला आहे. माझ्या अत्यंत व्यक्तिगत गोष्टींचे निर्णयही मला घेता आले नाहीत. हा त्रास पाहता मला माझ्या वडिलांना तुरूंगात डांबलं पाहिजे असं पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्स म्हणाली.
Britney Spears : सर्कस, इन द झोन, ब्लॅक आऊट अशा अनेक अल्बम्सनी जगभरातल्या तरुणाईच्या गळ्यातली ताईत बनलेली पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्स सध्या पुन्हा चर्चेत आहे. ब्रिटनीने जसं आपल्या गाण्यातून आपलं जगणं नेहमी चर्चेत ठेवलं तसं तिच्या पडद्यामागच्या तिच्या वर्तणुकीनेही लोकांना खाद्य दिलं. इतकंच नव्हे, तर फ्री ब्रिटनी नावाची चळवळ सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. कारण, लॉस एंजलिसच्या कोर्टात ब्रिटनीने कोर्टासमोर दिलेल्या साक्षीने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात ती किती त्रस्त होती हे उघड झालं आहे. इतकंच नव्हे, तर आपल्यावर जे काही बेतलं आहे ते पाहता आपल्या वडिलांना तुरुंगात डांबलं पाहिजे असंही ती म्हणते.
ब्रिटनीचं करिअर चढत्या क्रमाने नव्हतं. अत्यंत लहान वयात ती जगासमोर आली. तिला प्रसिद्धी मिळाली आणि अमाप पैसाही. त्यातून जे व्हायचं ते झालं. ब्रिटनीचं पहिलं अफेअर मोडलं. त्याचा तिच्यावर इतका परिणाम झाला की ती व्यसनी बनली. त्यानंतर तिला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवावं लागलं. त्याचवेळी तिच्या वडिलांनी कोर्टाच्या रीतसर बाबींची पूर्तता करून कॉन्जरवेटरशिप घेतली. कॉन्जरवेटरशिप म्हणजे, कोर्टाला साक्ष ठरवून संबंधित व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी एका माणसाची नियुक्ती केली जाते. हा माणूस संबंधित व्यक्तीच्या खासगी तसंच सार्वजनिक आयुष्यावर लक्ष ठेवतो. त्याच्या सगळ्या आर्थिक बाबी सांभाळतो. कॉन्जरवेटरशिप घेताना काही नियम अटींचं पालन करावं लागतं. ते नियम पुढे कायम पाळावे लागतात. ब्रिटनीला याचाच आता त्रास होऊ लागला आहे.
ब्रिटनी स्पिअर्सच्या बाबतीत जेमी स्पिअर्स म्हणजे ब्रिटनीच्या वडिलांनी 2007 मध्ये ही कॉन्जरवेटरशिप घेतली. कोर्टात सर्व बाबींची पूर्तता करून ही कॉन्जरवेटरशिप मिळवली गेली. त्यानंतर गेल्या 12 वर्षापासून ब्रिटनीच्या आयुष्यावर अंकुश लागला आहे आणि त्याच कायदेशीर नियम अटीचा आता ब्रिटनीला त्रास होऊ लागला आहे. ही कॉन्जरवेटरशिप आता काढून टााकावी यासाठी ब्रिटनीने कोर्टात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. त्यावेळी बोलताना ब्रिटनी कोर्टासमोर म्हणाली, या कॉन्जरवेटरशिपमुळे मला फायदा व्हायच्या ऐवजी माझं नुकसान खूप झालं. गेल्या 12 वर्षापासून मी हे भोगते आहे. आता मी रोज भयंकर चिडते. माझा वेळ रडण्यात जातो. मला खरंतर लग्न करायचं आहे. मला आई व्हायचं आहे. पण ही कॉन्जरवेटरशिप मला ते करू देत नाही. गेल्या 12 वर्षात याने मला खूप त्रास झाला आहे. माझे वडील याला कारणीभूत आहेत. माझ्या अत्यंत व्यक्तिगत गोष्टींचे निर्णयही मला घेता आले नाहीत. हा त्रास पाहता मला माझ्या वडिलांना तुरूंगात डांबलं पाहिजे.
काही दिवसांपूर्वी जेमी स्पिअर्स यांनी ब्रिटनीबद्ल बोलताना मी एक चांगला बाप नसल्याचे उद्गार काढले होते. ब्रिटनीला कॉन्जरवेटरशिप नको असेल तर तिने ती रद्द करावी मला त्यात आनंदच आहे असंही पुढे म्हटलं होतं. ब्रिटनीच्या या कोर्टातल्या साक्षीनंतर सोशल मीडियावर फ्री ब्रिटनी असा हॅशटॅग ट्रेंड होतोय. ब्रिटनीने केलेलं हे वक्तव्य म्हणजे, सोनेरी कारकिर्दीला लागलेलं काळं ग्रहण मानलं जातं.
महत्वाच्या बातम्या :
- Pune : पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न
- Corona Update India : देशात गेल्या 24 तासांत 50 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर सक्रिय रुग्णसंख्या 6 लाखांहून अधिक
- Delta Plus : डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव वाढण्याची शक्यता, राज्यांनी खबरदारी घ्यावी, केंद्राचे निर्देश