(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delta Plus : डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव वाढण्याची शक्यता, राज्यांनी खबरदारी घ्यावी, केंद्राचे निर्देश
केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून डेल्टा प्लस व्हेरिएंटसंबंधी (Delta Plus) खबरदारी घेऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात असं निर्देश दिले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार हा वेगाने होत असून त्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींना हानी पोहोचते.
नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशनंतर आता देशाच्या इतर भागातही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना, विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना खबरदारी घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
बुधवारपर्यंत भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 40 रुग्ण सापडले आहेत. केरळमधील तीन जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्याने खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रात जळगाव आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण सापडले आहेत. तामिळनाडूमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एक रुग्ण सापडला आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट हा आतापर्यंत 11 देशांमध्ये सापडला आहे. आसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडून डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा अभ्यास करण्यात येत आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार हा वेगाने होत असून त्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींना हानी पोहोचते. डेल्टा प्लसवर काय उपचार घेता येतील तसेच याच्या विरोधात शरीरात अॅन्टिबॉडीज् तयार होतात का याची अद्याप माहिती नाही. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन या कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट (Variant of Concern) जाहीर केलं आहे. तसेच या तीनही राज्यांना केंद्र सरकारने हाय अलर्ट दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमने सूचना दिल्या आहेत की डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' आहे. याचा प्रसार जलदगतीने होत आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत तसेच केरळ आणि मध्यप्रदेशमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या राज्यांना अलर्ट केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या :