Thane : ठाण्याला पुराचा सर्वाधिक धोका, ठाण्यातील बांधकाम क्षेत्रात 27.5 टक्के वाढ
महाराष्ट्रात ठाणे शहराला पुराचा सर्वाधिक धोका असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. मुंबईतील वीरमाता जिजाबाई प्रौद्योगिकी संस्थानच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात ठाणे शहरातील पूर प्रभावित ठाणे पूर्व, सिडको ब्रीज, वृंदावन सोसायटी, राबोडी, चेंदणी कोळीवाडा, क्रांतीनगर आणि माजिवडा या भागांची स्थिती जाणून घेण्यात आली. वाढत्या शहरीकरणाच्या आधारावर हा अभ्यास करण्यात आला आहे. ठाण्यातल्या बांधकाम क्षेत्रात १९९५ ते २००० या पाच वर्षांत २७.५ टक्के वाढ झाली होती. २०५० सालापर्यंत ठाण्याच्या बांधकाम क्षेत्रात ५६ टक्के इतकी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शहरातला मोकळा भाग, जंगल, पाण्याचे स्रोत आणि खारफुटीचं जंगल आणखी कमी होणार आहे. ठाण्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी १७ नाले आहेत. त्यापैकी आठ नाले समुद्रसपाटीपासून सखल भागात आहेत तर सहा नाले उंचावर आणि तीन नाले समुद्रसपाटीच्या पातळीवर आहेत. त्यामुळं ठाण्याला पुराचा धोका अधिक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.