Ambernath Gas Leak : अंबरनाथ MIDC तील केमिकल कंपनीतील वायूगळतीवर नियंत्रण
अंबरनाथ: ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात मोठी रासायनिक वायूगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. MIDC मधील एका रासायनिक कंपनीतून गुरुवारी रात्री उशीरा वायूगळती (Chemical Gas Leakage) झाली. संबंधित कंपनीने जाणीवपूर्वक वायू सोडला की चुकून वायूगळती झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात (Ambernath News) धुराचे साम्राज्य पसरले होते. हा धूर मध्य रेल्वेच्या रुळांपर्यंत येऊन पसरला होता. इतक्या मोठ्याप्रमाणावर शहरात धूर पसरल्याने अनेक नागरिकांना त्रास झाल्याची माहिती आहे. मात्र, हा धूर किंवा वायू कसा पसरला, याबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या गॅस गळतीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी रात्री साधारण दहाच्या सुमारास मोरिवली एमआयडीसीच्या परिसरात उग्र वास येऊ लागला. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास जाणवू लागला. अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोडवर वायू मोठ्याप्रमाणावर पसरला होता. त्यामुळे नागरिकांना अग्निशामन दलाला घटनास्थळी पाचारण केले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तपास आणि चौकशी केली असता एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीतून गॅस सोडण्यात आला नाही, असे सांगण्यात आले. मात्र, अंबरनाथ परिसरात प्रचंड धूर पसरला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.