(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhagwan Pawar : मंत्र्याने दबाव आणल होता, निलंबीतअधिकाऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे : महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ प्रकरणात आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने ही कारवाई केली असून निलंबन काळामध्ये त्यांची बदली जिल्हा रुग्णालय नंदुरबारमध्ये करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. भगवान पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची कामं करण्यास सांगितली. इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला, असा गंभीर आरोप डाॅ. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मी नियमबाह्य काम केली नाहीत, म्हणून माझ निलंबन करण्यात आलं
पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कात्रज कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं, इतर खरेदीत दबाव आणला, पण मी नियमबाह्य काम केली नाहीत, म्हणून माझ निलंबन करण्यात आलं आहे. जुन्या तक्रारी काढून चौकशी समिती नेमून माझ निलंबन करण्यात आलं आहे. मंत्री महोदयांच्या दबावामुळे हे माझ निलंबन करण्यात आल आहे, असा दावा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रातून केला आहे. दरम्यान, डॉ. भगवान पवार यांच्याविरुद्ध कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनियमित कामकाज, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, मानसिक व आर्थिक त्रास देणे, आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप राज्य सरकारला आले होते. गेली दोन वर्षे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कोणतीच कारवाई झाली नव्हती.