(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद
IND vs ENG : इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक माऱण्यासाठी टीम इंडिया सज्ज असेल. टीम इंडिया आज गयानामध्ये दाखल झाली आहे.
IND vs ENG : टी20 विश्वचषक 2024 आता अखेरच्या टप्प्यात पोहचलाय. 27 जून रोजी उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. सकाळी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. तर संध्याकाळी 8 वाजता भारत आणि इंग्लंड यांचा आमनासामना होणार आहे. इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक माऱण्यासाठी टीम इंडिया सज्ज असेल. टीम इंडिया आज गयानामध्ये दाखल झाली आहे. रोहित शर्मा अॅण्ड कंपनीकडे 2022 च्या टी20 विश्वचषकातील बदला घेण्याची नामी संधी आलेली आहे. 2022 टी20 विश्वचषकात एडिलेड येथे उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा दहा विकेटने दारुण पराभव केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया गुरुवारी मैदानात उतरेल. पण भारतीय संघाला इंग्लंडच्या एका गोलंदाजापासून सावध राहायला हवं. इंग्लंडचा तो गोलंदाज नेहमीच भारताविरोधात भेदक गोलंदाजी करतो. 2022 टी20 विश्वचषकात इंग्लंडच्या त्या गोलंदाजांने भारताचे तीन महत्वाचे फलंदाज बाद केले होते. त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या त्रिकुटाचा समावेश होता. गुरुवारी याच गोलंदाजापासून टीम इंडियाला सावध राहावे लागणार आहे. टी20 विश्वचषकात नेहमीच टीम इंडियाची डोकेदुखी ठरणाऱ्या गोलंदाजाचे नाव ख्रिस जॉर्डन असे आहे. त्याने नुकतीच हॅट्ट्रीक घेण्याचा किमया साधली आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही नक्कीच वाढला असेल.
ख्रिस जॉर्डनपासून सावध राहावे लागेल
इंग्लंडला जेव्हा जेव्हा गरज पडते, तेव्हा तेव्हा ख्रिस जॉर्डन धावून येतो. टी20 विश्वचषकात त्यानं डेथ ओव्हरमध्ये भेदक मारा केलाय. त्यामुळे त्याला टी20 विश्वचषकात डेथ ओव्हर सेपाशिलिस्ट म्हटले जातेय. ख्रिस जॉर्डन टीम इंडियाविरोधात नेहमीच भेदक मारा करतो. त्याने भारताविरोधातील 15 टी20 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. टी20 फॉर्मेटमध्ये जॉर्डनच्या सर्वाधिक विकेट भारताविरोधातच आहेत.
2022 मध्ये भारताचं कंबरडे मोडले होते, तीन फलंदाजांना पाठवले तंबूत
2022 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड यांचा आमना सामना झाला होता. त्या सामन्यात इंग्लंडने भारताचा दहा विकेटने दारुण पराभव केला होता. याच सामन्यात ख्रिस जॉर्डन याने भेदक गोलंदाजी करत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश होता. उपांत्य सामन्यात ख्रिस जॉर्डन यानं पहिल्यांदा रोहित शर्माला 27 धावांवर तंबूत पाठवले होते. त्यानंतर अर्धशतक ठोकणाऱ्या विराट कोहलीलाही बाद केले होते. डेथ ओव्हरमध्ये विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या हार्दिकलाही तंबूचा रस्ता दाखवला होता. हार्दिक पांड्याने त्यावेली 33 चेंडूमध्ये 63 धावांची तुफानी फलंदाजी केली होती. महत्वाच्या तीन फलंदाजांना बाद करत ख्रिस जॉर्डनने टीम इंडियाचं कंबरडे मोडले होते. आताही ख्रिस जॉर्डन लयीत दिसत आहे, त्यामुळे भारताने सावध राहायला हवं.
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज!