पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन संताप व्यक्त करत परळीत अजित पवारांचे राष्ट्रवादी समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.
बीड : लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव भाजप कार्यकर्ते आणि मुंडे समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर पंकजा मुंडें समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे, पंकजा यांनी स्वत: मतदारसंघात फिरुन आणि पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन समर्थकांना आवाहन केलं आहे. कोणीही असं टोकाचं पाऊल उचलू नका, माझ्यासाठी मरण्यापेक्षा माझ्यासाठी लढणारे कार्यकर्ते व्हा, असे म्हणत आगामी निवडणुकांत आपण पुन्हा विजयी होऊ, असा विश्वासही पंकजा यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, पंकजा मुंडेंच्या पराभवावर भाष्य करताना अनेकदा बीड (Beed) जिल्ह्यातील सामाजिक परस्थिती कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं. त्यावरुन, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पंकजा व प्रीतम मुंडेंवर टीका केली होती. त्यावरुन, राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन संताप व्यक्त करत परळीत अजित पवारांचे राष्ट्रवादी समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. सुषमा अंधारे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे परळीत दहन करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. पंकजा मुंडे यांच्याबद्दल चुकीचे मत व्यक्त केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव हा जातीयवादामुळे झाला नसून बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचे विकास कामे केले नाहीत म्हणून झाला, असे मत सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीतून व्यक्त केले होते. अंधारेंच्या या उत्तरावर आता महायुतीकडून पलटवार केला जात आहे. भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिल्यानतंर परळीत राष्ट्रवादी समर्थकांनी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परळी शहरातील शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी, सुषमा अंधारे जातीवादी असल्याची घोषणाबाजीही त्यांनी केली.
अंधारेंवर भाजपचाही पलटवार
भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारला आहे. मुंबईहून तुम्ही ज्या रस्त्याने परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडे यांनी बनवला आहे, एवढेच नाही तर प्रीतम मुंडे यांनी दत्तक योजनेमध्ये जे पोहनेर गाव घेतले होते, त्या पोहनेरमध्ये कोणतेही विकास काम करायचे बाकी नाहीत. केवळ भाजपावर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते, म्हणून पंकजा मुंडेंवर सुषमा अंधारे बोलत आहेत, अशा शब्दात कुलकर्णी यांनी सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
सुषमा अंधारेंचं वक्तव्य काय होतं
"ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदानं राहणारे लोक आहेत. यांच्याआडून राजकीय पुढारी आपला राजकीय स्कोर सेटल करत आहेत, तो स्कोर सेट करणं प्रचंड वाईट आहे. लोकसभा निवडणूक जातीवादावर गेली नाही तर विकासावर गेली आहे. इथल्या प्रश्नावर चर्चा कोणी करणार आहे की नाही? आष्टी, पाटोदा या ठिकाणच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळेच निष्कारण त्याला जातीवादाचं रूप देणं चुकीचं आहे." पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर अनेक लोकं बीडमध्ये म्हणतायेत की आता बीडचा विकास होणार नाही. त्यावर प्रश्न उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. आधी गोपीनाथ मुंडे, त्यानंतर प्रीतम मुंडे आणि प्रीतम मुंडेनंतर पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे नेतृत्व केले. या अगोदर विकास करण्यासाठी त्यांचे हात कोणी रोखले होते, असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.