Shivsena Mission : शिवसेनेचं नव मिशन ताई, माई , आक्का : ABP Majha
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना साद घालण्यासाठी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने खास मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मिशन “ताई, माई, अक्का” या खास मिशन अंतर्गत शिंदे गटाकडून महिला व्होटबँकेला साद घातली जाणार आहे. या मोहिमेतंर्गत शिंदे गटाकडून राज्य सरकारने महिलांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या प्रचारावर भर दिला जाणार आहे.
मिशन “ताई, माई, अक्का” अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिंदे गटाकडून महिलांचे मेळावे घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेला उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १ कोटी ८० लाखाहून अधिक अर्ज हे शासनाकडे आले आहेत. या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याच्या शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात शिवसेनेचा पहिला महिला मेळावा शुक्रवारी सिल्लोडमध्ये होणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन केले जाईल. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना या मेळाव्यांच्या माध्यमातून राज्यातील घराघरात पोहचण्यासाठी शिंदे गटाकडून ही मोहीम राबवली जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे ज्या बहिणी 31 ऑगस्ट रोजी अर्ज करतील, त्यांनाही जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे.
अजितदादा आता फक्त गुलाबी जॅकेट घालणार
विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजितदादा गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार आहे. गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वत: अजित पवार हेदेखील प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. त्यासाठी अजितदादांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचेही समजते.
विधानसभेला मुंबईसाठी भाजपचे विशेष प्लॅनिंग
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मुंबईसाठी खास रणनीती आखले आहे. सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे मुंबईतील मतदारसंघांकडे विशेष लक्ष देणार आहेत. मुंबईच्या 36 विधानसभा मतदासंघांसाठी बैठका घेऊन रणनीती ठरवली जाणार आहे. संघ आणि भाजपकडून मुंबईतील मतदारसंघांचा एकत्रितपणे सर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील भाजपच्या उमेदवारांची निवड केली जाईल.