(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Western Railway : खाररोड ते गोरेगाव सहाव्या मार्गिकेचं काम, 5 नोव्हेंबरपर्यंत 2,525 लोकल फेऱ्या रद्द
Western Railway Block Updates: पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) खाररोड ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम (Sixth Route) सुरू आहे. त्यामुळे 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत 11 दिवसांत 2,525 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून या ब्लॉकचा खऱ्या अर्थानं फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज अप आणि डाऊन मिळून 316 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकात गर्दी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून पश्चिम रेल्वे मार्गावरील 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबपर्यंत या 11 दिवसांत 2,525 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. 27 आणि 28 तारखेला प्रत्येकी 256 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर रविवारी 116 अप आणि 114 डाऊन अशा एकूण 230 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून या ब्लॉकचा खऱ्या अर्थानं फटका बसण्यास सुरुवात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज अप आणि डाऊन मिळून 316 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. रोजच्या सुमारे एक हजार फेऱ्यांपैकी 23 टक्के फेऱ्या रद्द होणार आहेत. शिवाय या काळात संपूर्ण वेळापत्रक बदलणार असल्यानं, सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवास करणं कठीण होऊन बसणार आहे.