Mumbai School: उद्यापासून शाळा सुरु करा, मुंबई महापालिकेचे मुख्याध्यापकांना निर्देश ABP Majha
राज्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी 30 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. आठवडय़ाभरानंतर तडवी यांना पुन्हा शाळा सुरू होण्यासंदर्भात विचारणा केली असता 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या निर्णयात कोणताही बदल झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मुंबईतील बहुसंख्य पालक हे नोकरदार असून कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे ते कामाच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्यास तयारीसाठी शाळांनी एक दिवस आधी पालकांना सूचित करणे आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मात्र काही शाळा अद्याप शिक्षण विभागाच्या नव्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत.