Maharashtra Curfew | ठाण्यात संचारबंदीचे निर्बंध पायदळी तुडवत नागरिक रेल्वे स्थानकात
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर देखील लोकल ट्रेनमधल्या गर्दीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. स्थानकात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. आधीच्या लॉकडाऊन प्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग दिसून आली नाही. तिकीट खिडक्यांवर देखील सर्वांना टिकीट दिली जात आहे. तसेच आरपीएफ आणि जीआरपी देखील प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यू आर कोड तपासताना आढळून आले नाहीत. याचे कारण म्हणजे राज्य सरकारकडून रेल्वेला कोणत्याही प्रकारचे आदेश अजूनही प्राप्त झालेले नाहीत.
राज्य सरकारने स्थानकात कोणाला प्रवेश घ्यावा आणि कोणाला देऊ नये या संदर्भातल्या लेखी आदेश रेल्वेला दिले नाहीत. तसेच यावेळी निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीला देखील बोलावले गेले नव्हते. त्यामुळे रेल्वे स्थानकात घेणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश दिला जात आहे. तिकीट खिडक्यांवर देखील घेण्यासाठी आलेल्या सर्वांना तिकीट दिले जात आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात गर्दीचे निरीक्षण करुन मगच लोकलच्या फेऱ्या कमी करायच्या की तशाच ठेवायच्या याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.