तब्बल दीड कोटींचा बकरा!, सांगलीतील आटपाडीच्या जनावरांच्या बाजारात बोकडाची चर्चा
सांगली : मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प होते. तसे जनावराचे बाजार देखील बंद होते. मात्र आता हळूहळू बाजार सर्वत्र भरत आहेत. सांगलीच्या आटपाडीतील जनावरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. याच आटपाडीमधील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजाराला यंदा मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून येतोय. या बाजारात मेंढ्या, जनावरांबरोबरच तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा विक्रीसाठी आला होता. हा बकरा या बाजारातील उत्सुकतेचा विषय ठरला होता. बाजारात या बकऱ्याला 70 लाखाची मागणी आली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. आटपाडीत पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालू वर्षी मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द झाली. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येत आहे. रविवारी मोठ्या उत्साहात हौशी मेंढपाळ, पशुपालक यांनी आपल्या जनावरांसह हजेरी लावली.
जनावरांच्या बाजारासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या आटपाडीच्या बाजारात कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी बाजार भरला आणि या बाजारात सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी यांचा बकरा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला होता. तब्बल दीड कोटी किंमतीचा हा बकरा आहे. या बकऱ्याचे नाव चक्क मोदी बकरा आहे. तर मोदी नावाच्या या बकऱ्याला बाजारात त्यांनी दीड कोटी बोली लावली होती आणि यावेळी 70 लाखांपर्यंत या बकऱ्याला मागणी झाली. मात्र मेटकरी यांनी दीड कोटी शिवाय बकरा विक्री करणारा नसल्याचा निर्णय घेतल्याने हा दीड कोटींचा बकरा विकू शकला नाही.