40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी जीवाचं रान करतात, वर्षानुवर्षे गावी न जाता केवळ अभ्यास एके अभ्यास करत पुण्यातील भाड्याने केलेल्या खोलीत राहतात

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) (MPSC) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. त्यापूर्वीच, आम्ही तुम्हाला पेपर देतो तुम्ही 40 लाख रुपये द्या, असा नागपूरमधील एका कन्सलटंसीने दावा केल्याचे फोन रेकॉर्डिंग समोर आले आहेत. हे सगळे कॉल रेकॉर्डिंग एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना एका कन्सलटंसीकडून असे फोन आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितल्याने पुण्यातील (Pune) स्पर्धा परीक्षा वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढून कोणताही पेपर फुटलेला नाही, सगळे पेपर सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी जीवाचं रान करतात, वर्षानुवर्षे गावी न जाता केवळ अभ्यास एके अभ्यास करत पुण्यातील भाड्याने केलेल्या खोलीत राहतात. पुस्तके, क्लासेस आणि नोट्स काढून ही मंडळी एमपीएससी परीक्षेच्या पूर्व आणि मेन परीक्षेची तयारी करताना दिसून येतात. त्यामुळे, साहजिकच एमपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा ऐकूनही त्यांच्या काळजात धस्स होणार हे निश्चित. कारण, गेल्या कित्येक महिन्यांपासून ते प्रामाणिकपणे व मोठ्या कष्टाने आपलं सर्वस्व देऊन अभ्यास करतात, पण असा काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जात जातंय असेच म्हणावे लागेल. कारण, सध्या सोशल मीडियावर आणि स्पर्धा परीक्षा वर्तुळात पेपर फुटीचा व्हायरल झालेला फोन कॉलवरील संवाद.
व्हायरल कॉलमध्ये नेमकं काय आहे?
नमस्कार सर मी रोहन कन्सल्टंसी नागपूरमधून बोलत आहे.
आपले बोलणे झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मीटिंग करावी लागेल. त्यानंतर, ठरल्याप्रमाणे होईल. असे संभाषण रेकॉर्ड झालेला एक कॉल एका महिलेचा विद्यार्थ्याला आला आहे. तर त्याच विद्यार्थ्याला दुसरा फोन आला. त्यात आपण गट ब च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आपण या पदाची तयारी करत आहात. तर आपल्यासाठी एक ऑफर आहे, आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका 2 फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी 40 लाख रुपये द्यावे लागतील. आपल्याला विश्वास नसेल तर या परीक्षेला एकही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपले ओरिजनल कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल, असे एका पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे. या रेकॉर्डींग कॉलने खळबळ उडाली आहे.
यात संबंधीत विद्यार्थी तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशीही विचारणा करत आहे. तर मी तुमचा कोणी मित्र नाही, तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात. तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे. फक्त या फोन कॉलबद्दल कोणाला काही बोलू नका, असे सांगितले जात असल्याचंही संबंधित व्यक्ती म्हणत आहे. सध्या पुण्यात हा कॉल रेकॉर्डींग तुफान व्हायरल झालं असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
एमपीएससीचं स्पष्टीकरण
दरम्यान, व्हायरल रेकॉर्डींगवर एमपीएससी बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून एमपीएससीचा कुठलाही पेपर फुटला नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय.
हेही वाचा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
























