माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
येत्या 10 फेब्रुवारी पासून ही नवीन किट उपलब्ध करून देण्यात येणार असून सध्या यु.आय.डी.आय टेस्टिंगची प्रक्रिया सुरू आहे

मुंबई : राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी 4066 नव्या आधार किटचे वाटप 10 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार (Ashish shelar) यांनी आज दिली. नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड (Aadhar) नूतनीकरण करणे, पत्ता बदलणे, अशा विविध सेवा देणारी ई सेंटर राज्यभर सुरू असून यासाठी लागणारी 3,873 आधार कार्ड किट सन 2014 साली जिल्हाधिकारी कार्यालयाना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापैकी सुमारे 2,558 किट सध्या वापरात असून 1,315 किट नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 2,567 नव्या किटची मागणी करण्यात आली होती. याबाबत ग्रामीण भागातून आलेल्या मागण्या लक्षात घेऊन राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव पराग जैन नैनुटीया यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. नव्याने 4066 किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीनंतर घोषित केला.
येत्या 10 फेब्रुवारी पासून ही नवीन किट उपलब्ध करून देण्यात येणार असून सध्या यु.आय.डी.आय टेस्टिंगची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, नव्याने किट उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याला सर्वाधिक 338 कीट उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तर, भंडारधरा जिल्ह्याला सर्वात कमी 23 किट उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. पुणे जिल्ह्यानंतर लातूरमध्ये सर्वाधिक 271 किट उपलब्ध करुन दिली जात आहेत. तर, राजधानी मुंबई शहरात 103 आधार किट उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. दरम्यान, आधार कार्ड काढण्यासाठी किंवा आधार कार्डचे नुतनीकरण करण्यासाठी नागरिकांची सातत्याने वर्दळ दिसून येते. त्यातच, अनेकवेळा आधार कार्ड किटमधील मशिन नादुरुस्त असल्याने किंवा मशिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने आधार कार्ड केंद्रात नागरिकांची आधार कार्डसंदर्भातील कामे अडखळून राहतात.
कोणत्या जिल्ह्याला किती किट
अहिल्यानगरला 34 अकोला 78, अमरावती 109, छत्रपती संभाजीनगर 134, बीड 58, भंडारदरा 23, बुलढाणा 124, चंद्रपूर 74, धुळे 113, गडचिरोली 44, गोंदिया 48, हिंगोली 88, जळगाव 167 ,जालना 104, कोल्हापूर 188, लातूर 271, मुंबई शहर 103, मुंबई उपनगर 122, नागपूर 91, नांदेड 112, नंदुरबार 90, नाशिक 49, उस्मानाबाद 73 आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांना 153, परभणी 55, पुणे 338, रायगड 63, रत्नागिरी 59, सांगली 130, सातारा 132, सिंधुदुर्ग 160, सोलापूर 146, ठाणे 400, वर्धा 50, वाशिम 100, यवतमाळ 83 किट उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
