Uddhav Thackeray Plan for Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेसाठी ठाकरेंचा असा आहे प्लॅन
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून ज्या मतदारसंघात सेनेला आघाडी मिळाली आहे त्यांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच मित्रपक्षांच्या जागांचाही अहवाल अभ्यासला जाणार आहे. त्यामुळेच राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाचा अहवाल उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या संपर्कप्रमुखांकडून मागवला आहे.
लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू झाल्याचं दिसून येतंय. लोकसभेच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल याचा अहवाल उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपर्कप्रमुखांकडे मागितल्याची माहिती आहे. विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का? असल्यास उमेदवार कोण असावा? तसंच संभाव्य विजयाचे समीकरण कसं असेल याबाबत ठाकरेंनी अहवाल मागितला असल्याची माहिती आहे.
त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वतःच्या उमेदवाराचे तसंच मित्रपक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकारी यांनी काम केलं की नाही याबाबतचा अहवाल उद्धव ठाकरेंकडून मागवण्यात आला आहे.