उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
मला मुख्यमंत्र्यांची दया येते की कोण होतास तू काय झालास तू, एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जवळ घेतलंस तू,स्वत:च्या पांघरुणात घेतलंस तू

नागपूर : शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळा जाऊन शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेत नागपूरच्या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? असा सवाल उपस्थित केला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर अल्पसंख्यांकांच्या व्होटबँकेसाठी केलेल्या टीकेवरूनही पलटवारदेखील केला. कोण होतास तू, काय झालास तू.. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. यावेळी, अमित शाह (amit shah) यांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडिओ देखील फडणवीसांनी शेअर केला होता. त्यावर, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुनात घेतलास तू असे म्हणत पलटवार केला.
मला मुख्यमंत्र्यांची दया येते की कोण होतास तू काय झालास तू, एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जवळ घेतलंस तू,स्वत:च्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं. तसेच, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, असेही ते म्हणाले.
अमित शाहांवर पलटवार
अमित शाह खूप हिंदुत्ववादी आहेत, त्यांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. संघांनी तर मला शिकवूच नये, वंदे मातरमची तुम्ही चर्चा करताय, असे म्हणत अमित शाहांवर निशाणा साधला. तसेच, अमित शाह तुमच्या मंत्रिमंडळात किरण रिजीजू जे मंत्री आहेत ते म्हणतात मी गोमांस खातो. 9 डिसेंबरचा हा फोटो आहे, त्यांच्यासोबत ते जेवण करत आहेत. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणताय मग गोमांस खाणाऱ्या मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनी विचारला. तसेच, माझ्यावर बोलण्याआधी तुम्ही तुमच्या बुडाखालचं हिंदुत्व बघावं, मंदिराच्या परिसरात प्रकाश दिवा लागला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही न्यायाधीशांविरोधात महाभियोग आणला. कारण, त्यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त आहे, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले. अमित शाह यांचा मुलगा जय शाह पाकिस्तानसोबत भारताला खेळायला लावतो. आता तुम्ही सांगा? जय शाह हिंदुत्ववादी नाही म्हणून तो पाकिस्तानसोबत खेळायला लावता का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.
शेतकऱ्यांना मदत नाही
केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले राज्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही, नंतर घाईघाईने मदतीचा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावात नेमकं काय आहे? हे किती मदतीसाठी प्रस्ताव दिला आहे हे विचारलं पाहिजे? पीक विम्याची सुद्धा मदत व्हायला पाहिजे होती, त्याची सुद्धा थट्टा झाली आहे. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यावर सरकार काही कारवाई करणार आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
विरोधी पक्षनेतापद का दिलं जात नाही?
पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितलं आहे, भास्कर जाधव यांचं नावं दिलं आहे. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय नाही, उत्तर मिळालेलं नाही. विरोधी पक्ष नेतेपदाला तुम्ही घाबरताय का? बिन नंबरच्या मंत्र्यांना काय किंमत आहे? उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाही. त्यामुळे, मुख्यमंत्री यांना विचारलं पाहिजे की विरोधी पक्ष नेते पद का दिलं जात नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
अशा निवडणुका मी पाहिल्या नाहीत
अधिवेशन आटपून लगोलद प्रचारला लागतील. आता निवडणूक झाली, आत्तापर्यंत मी अशा निवडणुका पाहिल्या नाहीत. बाहेर राज्यात उदाहरण दिली जातील, बघा या राज्यात बेबंधशाही कशी सुरु आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये करण्यात आलेल्या दंडेलशाही आणि पैशाच्या अमाप वापरावरुन टीका केली.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी?
दरम्यान, लाडक्या बहिणीला 2100 रुपये कधी देणार हा मुद्दा उपस्थित करत राहणार. कारण, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर 2100 लाडक्या बहिणीला देऊ. जर त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले नाही तर त्यांना घरी बसावं लागेल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
























