Shivbhojan Thali : शिवभोजन थाळी केंद्रावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवभोजन थाळीवाटपात केंद्रचालकांकडून खाेट्या नाेंदी दाखवून लाखो रुपये लाटले जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर असे गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्राच्या संचालकांनी 31 जानेवारी 2022 अखेरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश अन्न व नागरीपुरवठा विभागाने काढले असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरून सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप फडणवीस यांच्यासह चित्रा वाघ यांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात केला होता. शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठीच शिवभोजन योजना सुरू केली आहे. शिवाजी महाराजांच्या नावे योजनेत भ्रष्टाचार होत असून, हा महाराजांचा अपमान असल्याचे सांगून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचे विधिमंडळात वाभाडे काढले होते.

















