Sanjay Raut Full PC : ठरलं तर मविआ आजही जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकते - संजय राऊत
Sanjay Raut Full PC : ठरलं तर मविआ आजही जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकते - संजय राऊत
राज्याच्या राजकारणात (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीतील धुसफुस चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या आमदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर (Matoshree) बोलावली आहे. ठाकरे विधानसभा निवडणुकीत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असून 288 जागांवर लढण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. त्याचसंदर्भात आमदारांची बैठक बोलावली असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच सर्व आमदारांच्या बैठकीपूर्वी संजय राऊतांच्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आमदारांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांनी दिली. तसेच, काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित झालं असलं तरी विदर्भातल्या काही जागांवरुन काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. मविआच्या फॉर्म्युल्यानुसार, ठाकरे गटाला विदर्भात 8 जागा मिळाल्या आहेत. मात्र, ठाकरे गट 12 जागांसाठी आग्रही आहे. विदर्भातल्या जागांवरुनच ठाकरे गट महाविकास आघाडीत नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत 288 जागांवर लढण्यासंदर्भात विचारविमर्श आमदारांसोबत केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.