Swami Avimukteshwaranand : गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय; अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणतात
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये विविध खात्यांसह एकूण 38 निर्णय घेण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी हे महत्त्वाचे निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात आणि देशातील देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण आणि गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून गोमातेसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना यापुढे "राज्यमाता- गोमाता" (Rajyamata Gomata) म्हणून घोषीत करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे.
पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर
प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना "कामधेनू" असे संबोधण्यात आलंय. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ.) तथापि, दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.