Kolhapur News: कोल्हापुरात सर्किट बेंचसमोर महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर लिक्विड कोट मारला, पण गायी म्हशीच्या तुप लोण्यापेक्षा कमी वेळात विरघळून गेला!
Kolhapur roads poor quality: कोल्हापूरमध्ये 100 कोटी खर्च करून केलेले रस्ते अवघ्या काही महिन्यांत खड्डेमय झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचसमोरील रस्ताही एका पावसात उखडला.

Kolhapur High Court Circuit Bench road damage: गाई, म्हशीचं तूप लोणी सर्वाधिक वेगाने वितळून जातं की कोल्हापूरमध्ये रस्त्यांसाठी वापरले जाणारे डांबर असेल की कथित लिक्विड असेल ते विरघळून जातं हे शोधण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. कोल्हापुरात शंभर कोटी रस्त्यांची अवघ्या काही महिन्यांमध्ये वाट लागली असतानाच आता एक महिन्यापूर्वी केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोरील (Kolhapur High Court Circuit Bench road damage) रस्त्याची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच १७ ऑगस्ट रोजी कार्यरत झालं. त्यापूर्वी सर्किट बेंच परिसरातील रस्त्याची डागडूजी करण्यात आली. मात्र ही डागडूजी अवघ्या महिनाभरामध्ये उकलून गेली आहे.
अवघ्या काही तासात लिक्विड कोर्ट पूर्णपणे वाहून गेला
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी भाऊसिंगजी रोड अत्यंत संवेदनशील असल्याने त्या मार्गावर नो पार्किंग नो हाॅकर्स झोन करण्यात आला. हा रस्ता केल्यापासून सुदैवाने सुस्थितीत होता. 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मनपाकडून याच रस्त्यावर लिक्विड कोट मारून खडी पसरण्यात आली. मात्र, काल झालेल्या एका पावसामध्येच हा लिक्विड कोर्ट पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक वेगाने काय विरघळून जातं याची चर्चा नेहमीच होते. इतकेच नव्हे तर काही चपखल फलक रिक्षा चालकांच्या रिक्षाच्या मागील बाजू सुद्धा दिसून येतात. मात्र असं का होतं याचे उत्तर आजतागायत मिळालेलं नाही.
सीपीआर चौकामध्येही रस्ता उखडला
रस्त्यावरील कोट वाहून गेल्यानंतर कोल्हापूर मनपा अधिकारी सुरेश पाटील यांच्याशी एबीपी माझाने विचारणा केली. सुरेश पाटील यांनी सांगितले की, या मार्गावर लिक्विड कोट राहून गेला होता. तो करताना खडी सुद्धा पसरली जाते. ती खडी दोन दिवसांनी उडून जाते. मात्र, तो लिक्विड कोट का उडून गेला या संदर्भात त्यांना मात्र स्पष्टपणे उत्तर देता आलं नाही. त्यांनी आम्ही पाहणी करतो आणि मग बोलून घेऊ असं सांगितलं. कोल्हापूरकरांच्या सुदैवाने हा रस्ता केल्यापासून सुस्थितीत होता. मात्र, त्याच्यावर लिक्विड कोट कोल्हापूरमध्ये काल झालेल्या पावसाने पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे त्यामध्ये खरोखरच लिक्विड होतं का? हे नव्याने शोधायची वेळ आली आहे. दुसरीकडे सीपीआर चौकामध्ये कोल्हापूर थाळीच्या समोर सुद्धा 50 मीटर रस्ता उखडला गेला आहे. त्यावर मात्र कोणत्याही प्रकारे डागडूजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे सर्व काम करत असताना ते प्रलंबित का ठेवण्यात आलं? हा सुद्धा मुद्दा उपस्थित होतो. दुसरीकडे खानविलकर पेट्रोल पंप चौकामध्ये सुद्धा पडलेल्या खड्ड्यांवर एका महिन्यामध्ये तीनवेळा डागडूजी करण्यात आली. ते सुद्धा एका पावसात उखडून गेलं आहे. त्यामुळे दर्जा नावाचा काही प्रश्न कोल्हापूर महापालिकेच्या कामांमध्ये राहिला आहे की नाही? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.
सीपीआर चौकापासून तोरस्कर चौक मार्गावरही खड्डेच खड्डे
दुसरीकडे, सीपीआर चौकापासून तोरस्कर चौक मार्गावर सुद्धा विविध ठिकाणी महाकाय खड्डे पडले आहेत. राजर्षी शाहू महाराज पोलीस संकूलसमोर जवळपास 70 ते 80 मीटर रस्ता उखडला आहे. हा पॅच केल्यास आणि खड्डे मुजवल्यास होणारी वाहतूक कोंडी सुद्धा कमी प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र, त्याकडे मनपा प्रशासनाचे अजूनही लक्ष गेलेलं नाही. त्या संदर्भात विचारणा केल्यास सुरेश पाटील यांनी ती कामे करून घेणार असल्याचे सांगितलं. दुसरीकडे त्याच मार्गावरील दोन महाकाय खड्डे ड्रेनेज विभागाकडून काँक्रिटने बुजविण्यात आले. मात्र, ते सुद्धा कालच्या पावसामध्ये उखडून गेले आहेत. दुसरीकडे 100 कोटी प्रकल्पातून केलेल्या रस्त्यांवर सुद्धा वरचा थर पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक भयावह अवस्था दसरा चौक ते संभाजीनगर या मार्गावर झाली आहे. कोल्हापूरच्या रस्त्यांची टक्केवारीचा विषय नेहमी चर्चिला गेला आहे. ही टक्केवारी सातत्याने कोल्हापूरकरांना खड्ड्यात घेऊन गेली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरकरांनाच या विरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























