(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ladki Bahin Yojana Advertisement : जाहिरातीतून भाजपचा काँग्रेस आणि नाना पटोलेंवर निशाणा
Ladki Bahin Yojana Advertisement : जाहिरातीतून भाजपचा काँग्रेस आणि नाना पटोलेंवर निशाणा
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करताना दिसत आहेत. पाच वर्षांत महायुतीने कोणतेही काम केलेले नाही. यावेळी राज्यातील जनता त्यांना सत्तेतून खाली खेचणार आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून केला जात आहे. तर आम्ही गेल्या काही वर्षांत सर्वाधिक काम केले असून जनता आम्हाला पुन्हा एकदा निवडून देईल, असं सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष म्हणत आहेत. दरम्यान, एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असताना महायुती विरोधकांवर एक गंभीर आरोप करत आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना रद्द होईल, अशा दावा महायुतीकडून केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून आता भाजपाने प्रचारासाठी एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसला लक्ष्य भाजपाने नुकतेच हा व्हिडीओ सगळीकडे प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून भाजपाने काँग्रेसला थेट लक्ष्य केलं आहे. एक मिनिट आणि 13 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रद्द करतील, असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. तसेच या योजनेतून मिळणारे पैसे हे महिला वेगवेगळ्या कामांसाठी वापरत आहेत, महिलांना मिळत असलेल्या पैशांचा चांगला वापर होत आहे, असेही या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.