Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यात महायुतील मोठं यश, भाजपच्या गोटात आनंदाला उधाण. सागर बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये महाराष्ट्रात भाजपची राजकीय त्सुनामी आल्याचे दिसून आले. राज्यातील एकूण 288 मतदारसंघांपैकी तब्बल 132 मतदारसंघांमध्ये एकट्या भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. हे भाजपसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. त्यासोबतच महायुतीमधील अन्य दोन घटकपक्षांची कामगिरीही चमकदार झाली आहे. शिंदे गटाचे उमेदवार 54 तर अजित पवार गटाचे उमेदवार 35 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे राज्यात महायुती सहजपणे सत्ता स्थापन करेल, हे आता जवळपास स्पष्ट आहे.
आज सकाळी निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला सत्तेत येण्याची आशा होती. त्यादृष्टीने मुंबईतील शिवसेना भवनात सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली होती. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या तीन तासांचे कल हाती आल्यानंतर मविआ आघाडीला 75 जागाही मिळणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मविआच्या गोटात प्रचंड निराशा पसरली आहे. परिणामी आज शिवसेना भवनात ज्याठिकाणी सेलीब्रेशन होणे अपेक्षित होते, त्याठिकाणी शिवसेना भवनात शुकशुकाट पाहायला मिळत होता. शिवसेना भवनात ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांच्याशिवाय फारसे कोणीही नव्हते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी म्हटले की, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, असे समीकरण दिसत आहे. हा धनशक्तीचा विजय आहे. महाराष्ट्रात महाविकास आाघाडीच्या ज्या सभा झाल्या, जो प्रतिसाद मिळाला, यावरुन राज्यातील जनतेला महायुती नको, असे चित्र दिसत होते. परंतु, सध्याचे निकाल अनाकलनीय आहेत, असे हर्षल प्रधान यांनी म्हटले.
तर दुसरीकडे भाजप आणि महायुतीच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनासाठी अनेक फोन येत आहेत. भाजपला महाराष्ट्रात मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आतापर्यंत राज्यातील 288 मतदारसंघाचे कल हाती आलेत. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा गटाच्या अदिती तटकरे यांचा श्रीवर्धन मतदारसंघातून विजय झाला आहे. तर 218 जागांवर महायुती आणि मविआ 58 आणि इतर उमेदवार 12 जागांवर आघाडीवर आहेत. महायुतीमध्ये भाजपला 130, शिंदे गट 54 आणि अजित पवार गटाचे उमेदवार 34 जागांवर आघाडीवर आहेत. हे महायुतीसाठी मोठे यश मानले जात आहे. तर महाविकास आघाडीची प्रचंड निराशा झाली आहे. सध्याचे चित्र पाहता महाविकास आघाडीपैकी तिन्ही पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतपत संख्याबळ मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे.