Konkan Refinery : कोकण रिफायनरीच्या मुद्द्यावर आज चर्चा, विनायक राऊत मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
कोकण अर्थात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रिफायनरीच्या नवीन जागेबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. आज किंवा उद्या अर्थात उद्धव ठाकरेंच्या वेळेनुसार होणाऱ्या या भेटील बारसू आणि सोलगाव या ठिकाणच्या जागेबाबतची माहिती यावेळी उद्धव ठाकरेंना दिली जाणार आहे. मुख्यबाब म्हणजे रिफायनरीकरता चर्चेत असलेल्या नवीन जागेबाबत प्रकल्प समर्थक आणि प्रकल्प विरोधक यांनी आपलं निवेदन खासदार राऊत यांच्याकडे दिलं असून हि दोन्ही निवेदनं देखील उद्धव ठाकरेंना दिली जाणार आहेत. नाणार येथील अधिसुचना रद्द झाल्यानंतर बारसू आणि सोलगाव या ठिकाणी एमआयडीसी प्रस्तावित असून त्या ठिकाणी रिफायनरी उभारावी. जागा कमी पडल्यास आसपासच्या गावांमधील जागा घ्यावी अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे नवीन जागा रिफायनरीसाठी चर्चेत आली असून याबाबत रिफायनरी विरोधक आणि समर्थक यांनी आपलं निवेदन खासदार राऊत यांच्याकडे दिलं आहे. उद्धव ठाकरेंची भेट झाल्यानंतर हि दोन्ही निवेदनं देखील त्यांना दिली जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे बारसु, सोलगाव, शिवणे खुर्द, देवाचे गोठणे आणि गोवळ या पाच गावांमधील लोकांचं प्रकल्पाला असलेलं समर्थन आणि विरोध याचा विचार यावेळी प्रामुख्यानं केला जाणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे या भेटीनंतर शिवसेना या मुद्द्याला कशारितीनं हाताळणार हे पाहावं लागणार आहे.