Antilia Explosives Scare | अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा तपास NIA कडे
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडीचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहविभागाकडून हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "याचा तपास एटीएसकडे दिलेला आहे. या व्यतिरिक्त तपास एनआयकडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर यात नक्कीच काळंबेरं आहे." माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच हा विरोधी पक्ष महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासास्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली. त्यातच या कारचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीत आढळला होता. यानंतर या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एनआयएकडे तपास देण्याची मागणी केली होती.
त्यानंतर केंद्रीय गृहविभागाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "यापूर्वीच हा तपास गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. आमचा आमच्या यंत्रणांवर विश्वास आहे. या व्यतिरिक्त हा या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा विचार असेल तर नक्कीच यात काही काळंबेरं आहे. आम्ही सुद्धा तपासातून ते उघड करणार आहोत."