Zero Hour With Sarita Kaushik : सरकारमधून बाहेर पडण्याची फडणवीसांनी दुसऱ्यांदा व्यक्त केली इच्छा
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र सरकार बाहेर राहण्याची इच्छा व्यक्त करण्याची ही दुसरी वेळ. शिंदे सरकार बनलं तेव्हा पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना बळेच उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावलं होतं. खरंतर तेव्हापासून आणि त्यानंतर अजितदादा सोबत आल्यावर या सरकारमध्ये समन्वय राखण्याचं काम फडणवीस करत आले आहेत. पक्षासाठी ही कसरत करत असतानाच, लोकसभेत पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली.. या पराभवाची जबाबदारी घेत पायउतार होण्याची इच्छा ते व्यक्त करत असतील यामागे उद्विगनता हे महत्वाचं कारण असेल. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यासमोरचा मार्ग हा काटेरी आणि आव्हानांनी भरलेलाच राहिला आहे. हे सगळं करत असताना आपल्याकडून काही चुका झाल्यात का.. पक्षातील जुन्या जाणत्या सहकाऱ्यांंना आणखी व्यवस्थित हाताळायला हवं होतं का?.. काही लोकांवर विश्वास टाकण्याची घाई केलीय का?.. महाराष्ट्रातील गढूळ झालेलं जातीचं राजकारण समजून घेण्यात आपण कमी पडलोय का?... अशा काही विरोधकांचं उपद्रवमूल्य ओळखण्यात कमी पडलोय का?.. त्यांना हलक्यात घेण्याची चूक झालीय का.. अशा आणि अनेक इतर बाबींवर फडणवीसांसारखे चाणाक्ष नेते चिंतन जरुर करतील.. आता हे काम ते सरकारमध्ये राहुन करतात की बाहेर पडून हे लवकरच कळेल. पण एक गोष्ट नक्की ... आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच्या बाहेर पडणे हे त्यांना वैयक्तिकरित्या उसंत देऊन जाईलही... एक नवी दृष्टी घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी सुद्धा त्यांना मिळेल... पण महायुती सरकारला फडणवीस बाहेर पडल्यास मात्र चेहरा, विश्वासार्हता, सहकार आणि समन्वय सर्वच बाबतीत फटका बसेल.