IND vs PAK: 'मानलं रे भाऊ...' सूर्यकुमार यादवचं विराट कोहलीसाठी थेट मराठीतून ट्वीट
Suryakumar Yadav On Virat Kohli: टी-20 विश्वचषकात भारतीय संघानं त्यांच्या पहिल्याच सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारूण पराभव केला.
Suryakumar Yadav On Virat Kohli: टी-20 विश्वचषकात भारतीय संघानं त्यांच्या पहिल्याच सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारूण पराभव केला. मेलबनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) पाकिस्तानच्या तोंडातून विजयी घास हिसकावला. त्यानं 53 चेंडूत नाबाद 82 धावांचं मोलाचं योगदान देत भारताला विजय मिळवून दिला. विराटच्या या अफलातून खेळीचं जगभरातून कौतुक केलं जातंय. अनेक दिग्गज खेळाडू विराटची पाठ थोपावत आहेत. यातच भारताचा आक्रमक फलंदाज सूर्युकमार यादवनंही (Suryakumar Yadav) ट्विटरच्या माध्यमातून विराटचं कौतूक केलं. मात्र, सुर्यानं केलेलं ट्वीट मराठीतून असल्यानं त्याच्या ट्विटची अधिक चर्चा रंगलीय.
पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजयानंतर सूर्यकुमार यादवनं भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीसाठी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मराठीत 'मानलं रे भाऊ...' असं लिहलं. दरम्यान, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी विराटला त्याच्या अफलातून खेळीसाठी शुभेच्छा दिल्या. पण सुर्याचं ट्विट सर्वात आकर्षित ठरलं.
सूर्यकुमार यादवचं ट्वीट-
𝙈𝙖𝙖𝙣𝙡𝙖 𝙧𝙚 𝙗𝙝𝙖𝙪𝙪𝙪𝙪𝙪 🔝🔥 pic.twitter.com/tWEZVW72l4
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) October 23, 2022
अर्शदीप सिंह, हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजी
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. अर्शदीपनं पाकिस्तानचा कर्णधार बाबरला शून्यावर बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतरही भारतानं गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. अवघ्या चार धावांवर असताना रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं आठ चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी तीन-तीन तर मोहम्मद शमी भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
विराटच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताचा चार विकेट्सनं विजय
पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, विराट कोहलीनं संघाची बाजू संभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-