(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Babar Azam : बाबरमुळं होतंय पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान, माजी क्रिकेटर दानिश कनेरियाचं वक्तव्य
Pakistan Cricket : दानिश कनेरियाने 2022 च्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानच्या खराब कामगिरीबद्दल बाबर आझमला कारणीभूत ठरवलं आहे.
Danish Kaneria on Babar Azam : पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने (Danish Kaneria) टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानच्या खराब कामगिरीबद्दल बाबर आझमला कारणीभूत ठरवत त्याला जिद्दी असल्याचंही म्हटलं आहे. बाबर सतत फ्लॉप होऊनही ओपनिंग स्लॉट सोडत नसल्यामुळे दानिशनं हे वक्तव्य केलं आहे. बाबर आझमच्या जिद्दीमुळे पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान होत असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. दानिश कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ही प्रतिक्रिया दिली आहे.
दानिश बाबरबद्दल बोलताना म्हणाला, 'बाबरला सलामीची जागा सोडायची नाही. कराची किंग्जकडून खेळतानाही असेच झाले. तो मधल्या फळीत फलंदाजी करू शकत नसल्यामुळे तो वरच्या फळीतच खेळत आहे. त्याचा हट्टीपणा पाकिस्तान क्रिकेटला नुकसान पोहोचवणारा आहे कारण जेव्हा तो सलामीला येतो तेव्हा तो खूप हळू फलंदाजी करतो. यंदाही संपूर्ण टी20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आझम फ्लॉप ठरला. उपांत्य फेरीत त्याने केवळ थोडीफार खेळी केली. उर्वरित सामन्यात तो काही कामगिरी करु शकला नाही. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही खूपच खराब होता. त्यामुळेच प्रत्येक सामन्यात पाकिस्तानला अतिशय संथ सुरुवात झाली, ज्याचा तोटा पाकिस्तानला झाला.
'विराटकडून त्यानं शिकावं'
दानिश कनेरियाने बाबर आझमला विराट कोहलीकडून शिकायला हवं असा सल्ला दिला आहे. विराट कोहलीसारखं निस्वार्थीपणे कोणीच खेळत नाही असं त्याने म्हटलं आहे. कनेरिया म्हणाला, 'जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली संघ विश्वचषक हरला तेव्हा त्याला जबाबदार ठरवलं गेलं. त्याच्या संघात असण्यावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले पण त्याने हार मानली नाही. त्याने नवीन कर्णधाराला आपला पूर्ण पाठिंबा दिला आणि कर्णधाराने त्याला फलंदाजीला पाठवले त्या नंबरने त्याने बॅटिंग केली.'
फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव
टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह 2010 नंतर पुन्हा एकदा इंग्लंडनं टी20 विश्वचषक जिंकला आहे.
हे देखील वाचा-