Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
सिंधुदुर्ग : राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांच्या राजकीय संन्यासाचे संकेत दिले आहेत. आता घरी बसायचं ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेन... नांदा सोख्यभरे, असं नारायण राणे म्हणाले. माझ्यानंतर विकासात्मक राजकारण निलेश आणि नितेश करतील, त्यांनी हाक दिल्यावर ओ द्या असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. नारायण राणेंच्या सिंधुदुर्गात (Sindhudurg) जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले.
वय वाढेल तसं शरीर थकतंय, दोन्ही मुलं राजकारणात सेट झाल्यानंतर बिझनेसकडे कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजे असं नारायण राणे म्हणाले. राजकारणात कट कारस्थान केलं जातंय, म्हणून ठरवलं, आता घरी बसायचं. दोन्ही मुलं राजकारणात चांगलं काम करत आहेत. चांगल्याला जोपासा, आणि सेवा करून घ्या असं भावनिक आवाहन नारायण राणेंनी केलं.
Narayan Rane Political Retirement : नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
सिंधुदुर्गातल्या सभेत बोलताना नारायण राणे म्हणाले की, "आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. हातात अंगठ्या घालून, काळ्या काचेच्या गाड्या घेऊन काही जण येतात... पण माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे. बऱ्याच जणांनी माझ्या आड येण्याचं काम केलं, त्यावर मी आज बोलणार नाही. तेव्हाही मला अडचणी आल्या, आतांही आल्या. राजकारणात कट कारस्थान केलं जातंय. त्यामुळे आता मी ठरवलंय, घरी बसायचं. मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे... चांगल्याला जोपासा."
'महायुतीच्या कार्यकर्त्यांनो एक व्हा.. मला कोणाचीच भीती नाही. पैशासाठी राजकारण करू नका. असले पैसे पचत नाहीत. माझ्यानंतर विकासात्मक काम निलेश, नितेश करतील. त्यांनी हाक दिली तर ओ द्या' असं आवाहन नारायण राणेंनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केलं.
नारायण राणे म्हणाले की, "राजकारणात जून महिना प्रत्येक निवडणुकीत दिसतो. कुणावर विश्वास ठेवावा असे लोक दिसत नाहीत. मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो, मात्र आजही लोक नाव काढतात. लोकसभा जिंकलो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या प्रेमापोटी भारावून गेलो. द्वेषाच्या राजकारणाला थारा देऊ नका, माझ्या रस्त्यात आला तर मी थारा देणार नाही."
पक्ष सांभाळा, स्वार्थ नको. या जिल्ह्यात माझ्या अगोदर आणि माझ्या नंतर एखाद्या नेत्याने माझ्यासारखं काम केलेलं दाखवा असं नारायण राणे म्हणाले.























