दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
Nilesh Lanke : अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास शरद पवार आणि अजित पवार यांना समाधान वाटेल, असं म्हटलं.

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आलेले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान माध्यमांसोबत बोलताना निलेश लंके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, त्यामुळे राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, असं खासदार लंके यांनी स्पष्ट केलं आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल, असं म्हटलं.
Nilesh Lanke काय म्हणाले?
पिंपरी-चिंचवड आणि पुण्याचा विकास शरद पवारांनी केला असून अजित पवारांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवून काम केल्याचं निलेश लंके म्हणाले. खासदार निलेश लंके यांनी पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार केला.निश्चितपणे आमचे चार उमेदवार चांगल्या मतानं विजयी होतील, कारण जनतेत आक्रोश आहे, असं निलेश लंकेंनी म्हटलं. दडपशाही करुन बऱ्याच उमेदवारांना बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला गेला.वेगवेगळे प्रकार राबवले गेले जे जनतेला मान्य नाही, असं निलेश लंके म्हणाले.
खऱ्या अर्थानं पुण्याचा विकास कोणामुळं झाला आहे तर त्याची सुरुवात शरद पवार यांच्यामुळं झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये औद्योगिकीकरण आणलं, आयटी सेक्टर शरद पवार यांनी आणलं. पिंपरी चिंचवड, पुण्याची महापालिका अजित पवारांच्या नेतृत्त्वात आणल्यानंतर त्यांनी या शहरांना वेगळ्या ऊंचीवर नेण्याचं काम केलं.
तुम्हाला कायम सांगत असतो, राष्ट्रवादी हा पक्ष नसून पवार साहेबांचा परिवार आहे. तो परिवार एकसंधपणे राजकीय कामात, सामाजिक कामात एकसंध राहत असेल तर सर्वांना आनंदाची गोष्ट आहे. सर्वसामान्य लोक देखील त्याचा स्वीकार करतील, असं निलेश लंके यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले असले तरी परिवार म्हणून सुखात आणि दु:खात हा परिवार एकत्र राहिलेला आहे. निश्चित दादांना जे समाधान आहे ते सर्वांना आहे. सगळे एकत्र आल्यानंतर पवार साहेबांना समाधान वाटणार आहे. राजकारण हे क्षणाला बदलत असतं, त्याचं भाकित कोणी करु शकत नाही. राजकारणात आलेल्या गोष्टी मान्य करायचं शिकायचं असतं, काय होणारे हे कोणीच सांगू शकत नाही, असं निलेश लंके म्हणाले.
तसेच पुण्यात अजित पवार गटाने गुन्हेगारांना दिलेल्या उमेदवारीवरून बोलताना, उमेदवार पात्र असल्यामुळेच त्यांना संधी देण्यात आली असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.




















