Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
Aaditya Thackeray On Ameet Satam : उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेमध्ये तीन लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी केला. तसेच त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही टीका केली.

मुंबई : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये शाब्दिक वार वाढल्याचं दिसतंय. मुंबईचे मॅमडनायझेशन होऊ देणार नाही, रंग बदलू देणार नाही असं म्हणून मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम (Ameet Satam) यांनी उद्धव ठाकरेंचा 'मामू' असा उल्लेख केला. तर उद्धव ठाकरेंनी साटम यांचा 'चाटम' असा उल्लेख केला. आता आदित्य ठाकरेंनीही अमीत साटम यांच्या आरोपांवर वक्तव्य केलं. मी अशा चिल्लर लोकांना उत्तर देत नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी अमीत साटम यांना फटकारलं.
मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांनी तीन लाख कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप अमीत साटम यांनी केला. तसेच भाजपच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार आरोप केले. तर आदित्य ठाकरेंनी भाजपच्या या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं.
Aaditya Thackeray On Ameet Satam : भाजपचा चेहरा उघड, आदित्य ठाकरेंचा टोला
पैशांवरुन, पदांवरुन, बंगले, पालकमंत्रिपद यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये भांडणं सुरू आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी ते एकत्र आलेले नाहीत असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर अमीत साटम यांच्या आरोपांवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी अशा चिल्लर लोकांना ओळखत नाही.
मुख्यमंत्र्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मला वाटलेलं ते सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत. पण, हळूहळू त्यांचा चेहरा उघड झाला आहे. मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्रात खोटारडेपणा कोण करतं. कोस्टल रोडचं भूमिपूजन त्याची घोषणा, कामाची पाहणी आम्ही केली. नोटबंदी, पडता रुपया, देशातील अतिरेकी हल्ले यांच्या काळात झालेले. याचं क्रेडिट आम्ही घेत नाही. त्याचं सर्व श्रेय भाजपचं आहे. देशात तुमचे सरकार आहे, राज्यात बारा वर्षे तुमच्या हातात सरकार आहे.आमचा पूर्वीचा वचननामा बघा, आम्ही सर्व वचनं पूर्ण केली आहेत."
Thackeray Brothers Vachannaama : ठाकरे बंधूंचा वचननामा
मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंनी युती जाहीर केल्यानंतर शिवसेना भवनात वचनमाना प्रसिद्ध करण्यात आला. विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी शिवसेना भवनाची पायरी चढली. यावेळी मुंबईच्या जनतेसाठी 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.
शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी सर्वात मोठं आश्वासन म्हणजे 700 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्यात आली. त्याचप्रमाणे 5 वर्षांमध्ये 1 लाख मुंबईकरांना परवडणारी घरं देण्याचीही हमी देण्यात आली. तसंच पाळणाघरे, पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी, रस्ते,कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टींवर यामध्ये भर देण्यात आला. त्यामुळे हा वचननामा महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेमचेंजर ठरणार का हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
BJP On Uddhav Thackeray : भाजपकडून उत्तर
ठाकरेंनी वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंना लक्ष करण्यात आलंय. हा जाहीरनामा म्हणेज कॉपी पेस्ट असल्याचं अमित साटम यांनी म्हटलं. तर उद्धव ठाकरेंनी 25 वर्षात मुंबई पालिकेत देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. आशिष शेलारांनीही ठाकरेंच्या वचनाम्यावरून ठाकरेंना लक्ष केलं.
ही बातमी वाचा:




















