एक्स्प्लोर
Under 19 World Cup | बांगलादेशचा सनसनाटी विजय, फायनलमध्ये टीम इंडियाशी सामना
पाकिस्तानचा धुव्वा उडवून भारतानं सलग तिसऱ्यांदा अंडर नाईन्टिन विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. आता या युवा शिलेदारांचा सामना होणार आहे तो पहिल्यांदाच फायनल गाठलेल्या बांगलादेशशी.

पोचेफस्ट्रूम : बांगलादेशच्या युवा संघानं न्यूझीलंडवर सहा विकेट्सनी सनसनाटी मात करुन अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारत आणि बांगलादेश संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशसमोर विजयासाठी 212 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशनं हे आव्हान 45 व्या षटकातच सहा विकेट्स राखून पार केलं. बांगलादेशच्या मेहमुदुल हसन जॉयनं 13 चौकारांसह 100 धावांची खेळी उभारली. त्याच्या या खेळीनं बांगलादेशला सिनियर असो वा ज्युनियर आयसीसी स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठून दिली.
दुसरीकडे भारताची युवा ब्रिगेड सज्ज झाली आहे पाचव्या विश्वविजेतेपदासाठी. पाकिस्तानचा धुव्वा उडवून भारतानं सलग तिसऱ्यांदा अंडर नाईन्टिन विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. आता या युवा शिलेदारांचा सामना होणार आहे तो पहिल्यांदाच फायनल गाठलेल्या बांगलादेशशी. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ सुपर फॉर्मात आहे. आतापर्यंत झालेल्या साखळी आणि बाद फेरीच्या पाचही सामन्यात भारतानं प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच आत्मविश्वासानं सामोरं जाण्याचा युवा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.
भारतीय संघाच्या या विश्वचषकातल्या सुपर फॉर्ममागे मुंबई आणि महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना, अथर्व अंकोलेकर या मुंबईकरांसह महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरची कामगिरी हे भारताच्या यशाचं गमक म्हणावं लागेल.
यशस्वीनं या स्पर्धेत एक शतक आणि तीन अर्धशतकांसह सर्वाधिक 321 धावांचा रतीब घातला आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याची शतकी खेळी ही अंडर नाईन्टिन विश्वचषकात भारतीय फलंदाजानं केलेल्या सर्वोत्तम खेळीपैकी एक ठरावी. दिव्य़ांशनही पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक ठोकून यशस्वीसोबत अभेद्य भागीदारी साकारली होती. डावखुरा फिरकी गोलंदाज अथर्व अंकोलेकरनं फलंदाजीतही आपली कमाल दाखवून दिली. उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियावरच्या विजयात अथर्वची अर्धशतकी खेळी मोलाची ठरली होती. महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरनंही त्या सामन्यात उपयुक्त योगदान दिलं होतं. या चार शिलेदारांसह लेग स्पिनर रवी बिश्नोई, कार्तिक त्यागी आणि सुशांत शर्मा या भारतीय आक्रमणानं संपूर्ण स्पर्धेत चांगलाच दबदबा राखला.
विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारताच्या कामगिरीचा आलेख हा नेहमीच चढत्या भाजणीचा राहिलाय. 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदा युवा विश्वचषक पटकावला. त्यानंतर विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं भारताला विश्वचषकाचा मान मिळवून दिला. आता प्रियम गर्गची युवा ब्रिगेड पाचव्यांदा तो पराक्रम गाजवण्यासाठी सज्ज झालीय. पोचेफस्ट्रूमच्या मैदानात तसं झालं तर तो एक नवा इतिहास ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
