एक्स्प्लोर
US Open : 15 वर्षांनी अमेरिकन मुली फायनलमध्ये आमने-सामने
स्लोआन स्टीफन्स आणि मॅडिसन कीज या दोघी अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये एकमेकींसमोर उभ्या ठाकतील, असं भाकित तीन महिन्यांआधी कुणी केलं असतं, तर लोकांनी त्याला मूर्खात काढलं असतं.
![US Open : 15 वर्षांनी अमेरिकन मुली फायनलमध्ये आमने-सामने U S Open 2017 Womens Final Sloane Stephens Vs Madison Keys US Open : 15 वर्षांनी अमेरिकन मुली फायनलमध्ये आमने-सामने](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/09154156/US-Open-Sloane-Stephens-vs.-Madison-Keys.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
स्लोआन स्टीफन्स आणि मॅडिसन कीज, अमेरिकेच्या याच दोन युवा टेनिसपटूंमध्ये आज मध्यरात्रीनंतर रंगणार आहे यंदाच्या अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीची फायनल. विशेष म्हणजे आजवरच्या कारकीर्दीत एका ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याची स्लोआन आणि मॅडिसनचीही पहिलीच वेळ आहे.
चोवीस वर्षांच्या स्लोआन स्टीफन्सनं नवव्या मानांकित व्हीनस विल्यम्सचा कडवं आव्हान 6-1, 0-6, 7-5 असं मोडून काढून फायनलमध्ये धडक मारली आहे, तर बावीस वर्षांच्या मॅडिसन कीजनं अमेरिकेच्याच कोको वॅण्डेवेघेचा 6-1, 6-2 असा धुव्वा उडवून फायनलचं तिकीट कन्फर्म केलं.
स्लोआन स्टीफन्स आणि मॅडिसन कीज या दोघी अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये एकमेकींसमोर उभ्या ठाकतील, असं भाकित तीन महिन्यांआधी कुणी केलं असतं, तर लोकांनी त्याला मूर्खात काढलं असतं. कारण त्याच सुमारास त्या दोघी त्यांना झालेल्या गंभीर दुखापतीतून नुकत्याच कुठं सावरत होत्या.
स्टीफन्सला डाव्या तळपायाला झालेल्या दुखापतीमुळं तब्बल अकरा महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली, तर मॅडिसन कीजच्या डाव्या मनगटावर गेल्या दहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करावी लागली होती. पण स्लोआन असो किंवा मॅडिसन... दोघींनीही त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरून अमेरिकन ओपनची फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवला आहे.
जागतिक टेनिस क्रमवारीत स्लोआन स्टीफन्स सध्या 83व्या स्थानावर, तर कीज 16व्या स्थानावर आहे. अमेरिकन ओपनच्या फायनलच्या निमित्तानं त्या दोघी केवळ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. याआधी 2015 सालच्या मियामी ओपनमध्ये त्या दोघी एकमेकींना भिडल्या होत्या. त्या सामन्यात मॅडिसन कीजनं स्लोआन स्टीफन्सवर 6-4, 6-2 अशी मात केली होती.
स्लोआन स्टीफन्स आणि मॅडिसन कीज यांच्या आजवरच्या कारकीर्दीची तुलना करायची, तर स्लोआनच्या नावावर डब्ल्यूटीए फायनल्सची चार विजेतीपदं जमा आहेत. मॅडिसननं आजवरच्या कारकीर्दीत तीन डब्ल्यूटीए विजेतीपदांवर आपलं नाव कोरलं आहे. स्लोआननं 2015 साली वॉशिंग्टन ओपनचं, तर 2016 साली ऑकलंड ओपन, मेक्सिकन ओपन आणि चार्लस्टन ओपनचंही विजेतेपद पटकावलं होतं.
मॅडिसन कीजनं 2014 साली इंग्लंडच्या ईस्टबोर्नमध्ये एगॉन इंटरनॅशनलचं, 2016 साली बर्मिंगहॅमच्या एगॉन क्लासिकचं, तर 2017 साली अमेरिकेच्या स्टॅनफर्डमध्ये बँक ऑफ क्लासिकचं विजेतेपद मिळवलं आहे.
स्लोआन स्टीफन्स आणि मॅडिसन कीजमधल्या फायनलच्या निमित्तानं अमेरिकन ओपनच्या विजेतेपदासाठी दोन अमेरिकन मुली आमनेसामने येण्याची ही गेल्या पंधरा वर्षांमधली पहिली वेळ ठरली आहे. याआधी 2002 साली विल्यम्स भगिनींमध्ये झालेल्या अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये सेरेनानं बाजी मारली होती. सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स भगिनींनी गेल्या वीस वर्षांत जागतिक महिला टेनिसवरच आपलं अधिराज्य गाजवलं आहे. येत्या काही वर्षांत त्या दोघीही आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त होतील. पण त्या दोघींची जागा घेण्यासाठी आपण सज्ज असल्याचं स्लोआन स्टीफन्स आणि मॅडिसन कीजनं अमेरिकेन ओपनची फायनल गाठून दाखवून दिलं आहे.
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)