एक्स्प्लोर
सलामीच्या पराभवाचा टीम इंडियाकडून वचपा, लंकेवर सहा विकेट्सनी मात
कोलंबोतल्या टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेत भारत-श्रीलंका सामन्यावरचं पावसाचं सावट अखेर दूर झालं आहे.

कोलंबो : टीम इंडियानं श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत सलामीला झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. या सामन्यात श्रीलंकेनं भारताला विजयासाठी १९ षटकांत १५३ धावांचं माफक आव्हान दिलं होतं. मनीष पांडेनं दिनेश कार्तिकच्या साथीनं रचलेल्या ६८ धावांच्या अभेद्य भागिदारीनं टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मनीष पांडेनं ३१ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४२ धावांची खेळी उभारली. तर दिनेश कार्तिकनं २५ चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद ३९ धावांची खेळी केली. दरम्यान, या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा हा अपयशी ठरला. तो अवघ्या 11 धावाच करु शकला. त्याआधी, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला १९ षटकांत नऊ बाद १५२ धावांत रोखलं. सलामीच्या कुशल मेंडिसनं झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकानं श्रीलंकेला दहा षटकांत दोन बाद ९४ धावांची मजल मारुन दिली होती. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानं श्रीलंकेला पुढच्या नऊ षटकांत ५८ धावाच जमवता आल्या. मूळचा पालघरचा आणि मुंबईकडून खेळणारा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरनं चार विकेट्स काढून श्रीलंकेला चांगलाच दणका दिला. ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरनंही दोन फलंदाजांना माघारी धाडून त्याला छान साथ दिली. जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल आणि विजय शंकरनं प्रत्येकी एक विकेट काढली.
आणखी वाचा























