SRHvsRCB Eliminator: हैदराबादची बंगलोरवर 6 विकेट्सनी मात, विल्यम्सनची अर्धशतकी निर्णायक खेळी
हैदराबादकडून केन विल्यम्सनने अर्धशतकीय निर्णायक खेळी केली. तर गोलंदाजीत हैदराबादकडून जेसन होल्डरने उत्कृष्ट गोलंदाजी केली.
SRHvsRCB Eliminator: आयपीएल 2020 च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. बंगलोरने दिलेले 132 धावांचं लक्ष्य हैदराबादने 19.4 षटकात पूर्ण केलं. जेसन होल्डर आणि केन विलियमसन हैदराबादच्या विजयाची हिरो ठरले. केन विल्यम्सन आणि जेसन होल्डरनं पाचव्या विकेटसाठी रचलेली 65 धावांची अभेद्य भागिदारी हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरली. विल्यम्सननं नाबाद 50 तर होल्डरनं नाबाद 24 धावांची खेळी उभारली. या विजयासह हैदराबाद आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळणार आहे. तर बंगलोरचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.
हैदराबादकडून केन विल्यम्सनने 44 चेंडूत 50 धावांची खेळी केली. मनिष पांडेने 24, जेसन होल्डरने 24 आणि डेविड वॉर्नरने 17 धावा केल्या. बंगलोरकडून मोहम्मद सिराजने दोन, तर एडम जम्पा आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 132 धावांचे लक्ष्य दिले होते. आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक 56 धावा केल्या. दरम्यान त्याने पाच चौकार लागले. बंगलोरकडून कर्णधार विराट कोहली आजच्या सामन्यात ओपनिंगला उतरला होता. मात्र अवघ्या सहा धावा करून तो बाद झाला. जेसन होल्डरने त्याला त्याची विकेट घेतली. त्यानंतर चौथ्या षटकात संघाची 15 धावसंख्या असताना एक धाव करत देवदत्त पड्डिकल बाद झाला.
पड्डिकल बाद झाल्यानंतर अॅरॉन फिन्च आणि एबी डिविलियर्सने बंगलोरचा डाव सावरला. या दोघांनी 41 धावांची भागिदारी केली. अॅरॉन फिन्च 30 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. फिंच बाद झाल्यानंतर मात्र बंगलोरचा डाव गडगडला आणि एका मागून एक विकेट पडल्या. मोईन अली 0, शिवम दुबे 8 आणि वॉशिंग्टन सुंदर 5 धावा करुन बाद झाला. एक बाजू लावून धरत एबी डिविलियर्सने 56 धावा केल्या. शेवटी मोहम्मद सिराजने 10 धावा आणि नवदीप सैनीने 9 धावा करत बंगलोरची धावसंख्या 130 च्या पुढे नेली. जेसन होल्डरने सनरायझर्स हैदराबादकडून दमदार गोलंदाजी केली. हैदराबादकडून जेसन होल्डरने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 25 धावा देऊन तीन बळी घेतले. टी नटराजनने दोन आणि शहबाज नदीमने एक विकेट घेतली.