Sikandar Sheikh : सिकंदर ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान
Sikandar Sheikh :'भीमा केसरी' (Bhima Kesari) स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लांना माती चारत सिकंदर शेख (Sikandar Sheikh) आणि महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आपापल्या गटात अजिंक्य ठरले आहेत.
Sikandar Sheikh : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या 'भीमा केसरी' (Bhima Kesari) स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लाला माती चारत सिकंदर शेखने (Sikandar Sheikh) विजय मिळवला. सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्रसिंहला आस्मान दाखवलं. तसेच महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याने देखील चांगला खेळ करत पंजाबच्या पैलवानाचा पराभव केला. या दोन्ही मल्लांनी हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. महाराष्ट्र केसरीएवढ्याच भव्यरितीनं आयोजित केलेल्या या भीमा केसरी स्पर्धेकडं सिकंदर आणि महेंद्र यांच्या उपस्थितीमुळं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
सिकंदर शेखनं धिप्पाड असणाऱ्या भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान
शेवटची कुस्ती सिकंदर शेखची होती. पंजाबचा सहा फूट उंच आणि धिप्पाड असा भूपेंद्रसिंह अजनाला याच्याविरुद्ध सिकंदर शेख भिडणार होता. भूपेंद्रसिंह अजनाला आखाड्यात उताराला तेव्हा सर्वच कुस्ती शौकिनांना सिकंदरची काळजी वाटू लागली होती. सुरुवातीला भूपेंद्रने सिकंदर याच्यावर आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सिकंदरने आपला ठेवणीतला खेळ सुरु करत डावपेचात टाकत भूपेंद्रला चितपट करत 'भीमा केसरी' खिताब पटकावला.
महेंद्र गायकवाड याची कुस्ती पंजाब युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोरा अजनाला या दिग्गज मल्लाशी होती. हे दोन्ही मल्ल मैदानात उतरल्यापासून महिंद्राने आपला नेहमीचा खेळ करण्यास सुरुवात केल्यानं पंजाबच्या गोरा या मल्लाने अनेकवेळा मैदानातून पळ काढण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या प्रत्येकवेळी महिंद्राने त्याला आखाड्यात ओढले. कुस्ती सुरु होताच महिंद्राने गोराला उचलून चिटपट केलं. महेंद्र गायकवाड याने भीमा वाहतूक केसरी स्पर्धा जिंकली. त्यानंतर महेंद्रने विजयी जल्लोष साजरा केला.
गेल्या आठवड्यात सिकंदर 'विसापूर केसरी' चा मानकरी
गेल्या आठवड्यातट सिंकदरने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चे (Visapur Kesari) मैदान मारलं होतं. त्यावेळी सिकंदर शेखने मोळी डावावर पंजाबचा (Punjab) पैलवान नवजीत सिंगला (Navjeet Singh) लोळवले होते. अवघ्या पाचच मिनिटात सिकंदरने कुस्ती करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे पारणे फेडले. या विसापूर केसरीसाठी महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशभरातून मल्ल आले होते. त्यामुळं या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.
खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचे आयोजन
खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भीमा केसरी कुस्त्यांचे आयोजन केले होते. टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर मोठा कुस्तीचा आखाडा बनविण्यात आला होता. पाच हजार प्रेक्षक बसू शकतील अशी भव्य गॅलरी देखील उभारण्यात आली होती. राज्यभरातून जवळपास 400 पेक्षा जास्त पैलवानांनी या स्पर्धेसाठी नवे नोंदवली होती. यातील 5 कुस्त्या या महत्वाच्या होत्या. या कुस्त्यांची 9 लाखांची बक्षिसे आणि चांदीच्या गदा दिल्या गेल्या. भीमा केसरीसाठी शेवटची लढत ही सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात झाली.
महत्त्वाच्या बातम्या:
Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखनं मारलं 'विसापूर केसरी'चं मैदान, पंजाबच्या पैलवानाला केलं चितपट