एक्स्प्लोर
Advertisement
रणजी करंडकाचा महासंग्राम आजपासून; मुंबई, विदर्भ, महाराष्ट्र नव्या मोसमासाठी सज्ज
यंदाच्या रणजी करंडकात चार गटातून 38 संघ सहभागी झाले आहेत. या 38 संघात साखळी फेरीच्या लढतीतून आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
मुंबई : भारतीय क्रिकेटमधल्या सर्वात प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. देशांतर्गत क्रिकेटमधल्या या सर्वात मोठ्या स्पर्धेचं यंदाचं हे 86वं वर्ष आहे. यंदाचा रणजी मोसम काहीसा उशिराने सुरु झाला असून 9 डिसेंबर 2019 ते 13 मार्च 2020 दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदाच्या रणजी करंडकात चार गटातून 38 संघ सहभागी झाले आहेत. या 38 संघात साखळी फेरीच्या लढतीतून आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
मुंबईची 'खडूस आर्मी' सज्ज
सर्वाधिक 41 वेळा रणजी करंडक पटकावलेला मुंबईचा संघही रणजीच्या नव्या मोसमासाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील मुंबईचा 'ब' गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात मुंबईची सलामीची लढत बडोद्याशी होत आहे.
मुंबईच्या संघात कर्णधार सूर्यकुमार यादवसह टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, आदित्य तरे, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर अशा अनेक मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
विदर्भ जेतेपदाची हॅटट्रिक साधणार?
फैज फझलच्या नेतृत्त्वात विदर्भाने गेल्या दोन रणजी मोसमात अभूतपूर्व कामगिरी बजावली. फैजचं कुशल नेतृत्व, वासिम जाफरचा तगडा अनुभव आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचं मोलाचं मार्गदर्शन याच्या जोरावर 2017-18 च्या मोसमात विदर्भाने आपला 84 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवून पहिल्यांदा रणजी करंडकावर नाव कोरलं होतं. 2018-19 च्या मोसमातही विदर्भाने हाच करिष्मा पुन्हा दाखवला आणि सलग दुसऱ्यांदा रणजी विजेतेपद पटकावलं. त्यामुळे गतविजेते पुन्हा एकदा विजेतेपदावर नाव कोरुन विजेतेपदाची हॅटट्रिक साधणार का याची उत्सुकता आहे. विदर्भाचा संघ नव्या मोसमात दिल्लीविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे.
वासिम जाफरचा 150 वा रणजी सामना
भारताचा माजी सलामीवीर आणि मूळचा मुंबईकर असलेल्या वासिम जाफरसाठी दिल्लीविरुद्धची लढत महत्त्वाची ठरणार आहे. कारण यानिमित्ताने 40 वर्षांचा वासिम जाफर रणजी कारकीर्दीतला 150 वा सामना खेळत आहे. या कामगिरीसह रणजी करंडकात 150 सामने खेळणारा जाफर हा आजवरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
भारताकडून गेल्या 31 कसोटी आणि 2 वन डे खेळलेल्या जाफरच्या नावावर रणजीत सर्वाधिक धावांचा विक्रम जमा आहे. 149 सामन्यांत जाफरने सर्वाधिक 40 शतकांसह तब्बल 11 हजार 775 धावांचा रतीब घातला आहे. 2017-18 आणि 2018-19 या दोन्ही मोसमात विदर्भाच्या विजयात जाफरची कामगिरी मोलाची ठरली होती.
महाराष्ट्राचं नशीब फळफळणार?
नौशाद शेखचा महाराष्ट्र संघ गेल्या 78 वर्षांपासूनची महाराष्ट्राची विजेतेपदाची प्रतिक्षा संपवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रणजी इतिहासात विजय हजारेंच्या संघाने 1939-40 आणि 1940-41 अशी सलग दोन वर्ष विजेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर 1970-71, 1992-93 आणि 2013-14 या मोसमांत अंतिम फेरी गाठूनही महाराष्ट्राला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. यंदाच्या मोसमात महाराष्ट्राची सलामी हरियाणाशी होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement