एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : स्पेन आणि रोनाल्डोच्या पोर्तुगालसाठी धोक्याची घंटा!
विश्वचषकाच्या ब गटात पोर्तुगाल आणि स्पेन हे दोन बलाढ्य संघ बाद फेरीच्या उंबरठ्यावर येऊन दाखल झाले आहेत. पण विश्वचषकाच्या लढाईत उभय संघांची पुढची परीक्षा खडतर झाली आहे.
मुंबई : रशियातल्या फिफा विश्वचषकात बाद फेरीचं तिकीट कोणत्या संघांना मिळणार, याची उत्सुकता आता वाढू लागली आहे. या विश्वचषकाच्या ब गटात पोर्तुगाल आणि स्पेन हे दोन बलाढ्य संघ बाद फेरीच्या उंबरठ्यावर येऊन दाखल झाले आहेत. पण विश्वचषकाच्या लढाईत उभय संघांची पुढची परीक्षा खडतर झाली आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल... आणि सर्जिओ रॅमोसचा स्पेन... फुटबॉलविश्वाच्या या दोन्ही महासत्तांनी विश्वचषकाच्या ब गटातून बाद फेरीचा दरवाजा ठोठावला आहे खरा, पण त्या दोन्ही संघांना धोक्याचा इशारा मिळाला आहे.
पोर्तुगाल आणि स्पेनमधला सलामीचा हायव्होल्टेज मुकाबला 3-3 असा बरोबरीत सुटला. पण पुढच्याच सामन्यात पोर्तुगालला मोरोक्कोने, तर स्पेनला इराणने 1-0 अशा निसटत्या विजयावर समाधान मानायला लावलं. रशियात विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पाहत असलेल्या पोर्तुगाल आणि स्पेनसाठी मोरोक्को आणि इराणसारख्या तुलनेत दुबळ्या संघांनी दिलेली झुंज म्हणजे धोक्याची घंटा ठरावी.
पोर्तुगालने यंदाच्या विश्वचषकातल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये चार गोलची नोंद केली आहे. पण हे चारही गोल एकट्या रोनाल्डोनेच डागले आहेत. त्यामुळे पोर्तुगालचा संघ प्रामुख्याने रोनाल्डोवर अवलंबून असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पोर्तुगालच्या कामगिरीत अजूनही सुधारणेला वाव असल्याचं रोनाल्डोने म्हटलं आहे. रोनाल्डोच्या या प्रांजळ कबुलीला खूप मोठा अर्थ आहे.
2010 साली चॅम्पियन ठरलेला स्पेन यंदाही विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात दाखवलेलं सातत्य स्पेनला इराणविरुद्धच्या सामन्यात राखता आलं नाही. त्या सामन्यात इराणच्या दोन बचावपटूंसोबत झालेल्या संघर्षात चेंडू दियागो कोस्टाच्या पायाला लागून गोलपोस्टमध्ये धडकला, हे स्पेनचं सुदैव ठरलं. त्या लकी गोलमुळेच स्पेनला विश्वचषकातला आपला पहिला विजय नोंदवता आला.
स्पेनच्या ताफ्यात सर्जिओ रॅमोस, दियागो कोस्टा, आंद्रे इनेस्टा, इस्को, डेव्हिड सिल्व्हासारख्या मातब्बर खेळाडूंची फौज आहे. पण दियागो कोस्टाचा अपवाद वगळता स्पेनला त्या दिग्गजांकडून आणखी कामगिरी उंचावण्याची अपेक्षा आहे.
थोडक्यात सांगायचं तर, पोर्तुगाल आणि स्पेनला विश्वचषकाच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर दोन्ही महासत्तांना आपापली कामगिरी उंचावावी लागणार आहे. प्रशिक्षक फर्नांडो सांतोस आणि हिएरो फर्नांडो यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही फौजा पुढच्या परिक्षेत कशी कामगिरी बजावतात, याकडे फुटबॉल चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement