(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paris Olympics : भारताचा ऑलिम्पिकमध्ये डबल धमाका, हॉकीमध्ये न्यूझीलंडला लोळवलं, बॅटमिंटनमध्ये फ्रान्सला धूळ चारली
Paris Olympics : भारताच्या हॉकी टीमनं पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला3-2 असं पराभूत केलं. तर, चिराग शेट्टी आणि सात्विकनं बॅडमिंटन दुहेरीत फ्रान्सच्या जोडीला पराभूत केलं.
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) पहिला दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. नेमबाजीत थोडसं अपयश आलं असलं तरी मनू भाकर (Manu Bhakar) हिनं 10 मीटर एअर पिस्टल महिला क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत धडक दिली आहे. यानंतर भारतासाठी पॅरिसमधून अनेक चांगल्या बातम्या आल्या. टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकीमध्ये भारतानं विजय मिळवला. विशेष म्हणजे हॉकीमध्ये भारतानं (Indian Hockey Team) न्यूझीलंडला 3-2 अशा फरकानं पराभूत केलं. टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाईनं विजय मिळवला. तर बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेननं एकेरीत आणि चिराग शेट्टी आणि सात्विक यांनी दुहेरीत विजय मिळवला. भारताच्या बॅडमिंटनपटूंच्या जोडीनं यजमान फ्रान्सला पराभवाचं पाणी पाजलं.
भारताची हॉकीमध्ये विजयी सलामी
भारतानं हाकीमध्ये पहिला विजय न्यूझीलंड विरुद्ध मिळवला. रोमांचक लढतीत भारतानं 3-2 असा विजय मिळवला. भारतासाठी मनदीप सिंग, विवेक सागर आणि हरमनप्रीत कौरनं गोल केला. भारतासाठी निर्णायक गोल हरमनप्रीतनं 59 व्या मिनिटाला केला.
बॅडमिंटनमध्ये सात्विक आणि चिरागचा फ्रान्सच्या खेळाडूंवर विजय
बॅडमिंटनमधील भारतासाठी आजचा दिवस चांगला होता. सात्विक आणि चिराग शेट्टीनं दुहेरीच्या पहिल्याच मॅचमध्ये फ्रान्सच्या कोरवी आणि लबारला पराभूत केलं. चिराग आणि सात्विकनं दोन्ही गेम जिंकले. पहिला गेम 21-17 आणि दुसरा गेम 21-14 नं भारतानं जिकंला. भारताची जोडी पुढच्या फेरीत पोहोचली.
लक्ष्य सेनची विजयी सलामी
भारताचा युवा बॅडमिंटनपटू यानं एकेरीच्या पहिल्या फेरीत सहजपणे विजय मिळवला. केविन कॉर्डनला त्यानं पराभूत केलं. विशेष म्हणजे कॉर्डननं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्यानं उपांत्य फेरीत धडक दिली होती.
हरीमत देसाईनं टेबल टेनिसमध्ये दमदार कामगिरी केली. हरमीत देसाईनं जॉर्डनच्या जायद अमन याला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
मनू भाकरची अंतिम फेरीत धडक
मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल महिला प्रकारात अंतिम फेरीत धडक दिली आहे. पात्रता फेरीत मनू भाकर तिसऱ्या स्थानावर पोहोचली. उद्या दुपारी साडे तीन वाजता अंतिम फेरीची लढत होणार आहे. मनू भाकरच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहणार आहे.
उद्या ऑलिम्पिकमध्ये पीव्ही. सिंधू पहिल्या बॅडमिंटनच्या सामन्यात खेळणार आहे. पी.व्ही. सिंधूच्या कामगिरीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :