(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra : नीरज चोप्राचा अंतिम फेरीत पाकिस्तानच्या खेळाडूशी सामना, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत पुन्हा इतिहास रचण्याची संधी
Neeraj Chopra : भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.
Paris Olympics पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकचा आज अकरावा दिवस आहे. भारतासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक दिली आहे. गट बच्या पात्रता फेरीत नीरज चोप्रानं 89.34 मीटर भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरज चोप्रा समोर पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीम याचं देखील आव्हान असेल. नीरज चोप्रा ब गटात पहिल्या स्थानावर राहिला. केवळ एकाच प्रयत्नात नीरज चोप्रानं अंतिम फेरीत धडक दिली.
नीरज चोप्राच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. नीरज चोप्रानं पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांना नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची आशा आहे. नीरज चोप्राची भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी 8 ऑगस्टला होणार आहे.
ब गटातून कोण कोण पात्र ठरलं?
भालाफेक स्पर्धेत पात्रता फेरीच्या ब गटातून भारताचा खेळाडू नीरज चोप्रा, ग्रेनाडाचा ए. पीटर्स आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम देखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.
नीरज चोप्रानं 89.34 मीटर भाला फेकला. तर, ए. पीटरनं 88.63 मीटर भाला फेकला. याशिवाय पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं 86.59 मीटर अंतरावर भाला फेकण्यात यश मिळवलं. नीरज चोप्रा, ए पीटर आणि अर्शद नदीम हे तिघे पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुसरीकडे भारताची पैलवान विनेश फोगटनं इतिहास रचला आहे. तिनं 50 किलो ग्राम वजनी गटात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या युई सुसाकीला पराभूत केलं होतं. विनेश फोगटनं टेक्निकल पॉईंटच्या आधारे विजय मिळवला.
दरम्यान, नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 ऑगस्टला भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. यावेळी देखील नीरज चोप्रा तशी कामगिरी करणार का हे पाहावं लागणार आहे.
नीरज चोप्राची अंतिम फेरीची लढत कधी?
भारताला नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची आशा आहे. सुवर्णपदकासाठी अंतिम फेरीची लढत 8 ऑगस्टला रात्री 11.50 मिनिटांनी होणार आहे. भारतातील सर्व नागरिकांचं लक्ष नीरज चोप्राकडे लागलं आहे.
दरम्यान, भारत आणि जर्मनी हॉकीची उपांत्य फेरीची लढत आज रात्री साडे दहा वाजता होणार आहे. सेमी फायनलमध्ये भारतीय हॉकी संघ यश मिळवणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :