एक्स्प्लोर
धोनी म्हणाला होता, 'पाय तुटला तरी चालेल, पण पाकिस्तानविरुद्ध खेळणार'
आशिया चषकात धोनीला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या जागी पर्यायी खेळाडूलाही बोलावण्यात आलं. मात्र आपला पाय तुटला तरीही पाकिस्तानविरुद्ध खेळू, असं धोनी म्हणाला होता.
चेन्नई : गेल्या वर्षी आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार महेंद्र सिंह धोनीला दुखापत झाली होती. मात्र त्याने कसलीही चिंता न करता त्या सामन्याचं नेतृत्व केलं आणि भारताला विजय मिळवून दिला. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी तेव्हाचा एक किस्सा शेअर केला आहे.
एमएसके प्रसाद यांनी एका कार्यक्रमात बोलताना हा प्रसंग शेअर केला. धोनीच्या जागी पर्यायी खेळाडूला खेळवलं जाणार होतं. मात्र आपला पाय तुटला तरी आपण पाकिस्तानविरुद्ध खेळू, तुम्ही चिंता करु नका, असं धोनी आपल्याला म्हणाल्याचं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.
तामिळनाडू क्रीडा पत्रकार संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात एमएसके प्रसाद यांनी फेब्रुवारी 2016 साली ढाका इथे खेळवण्यात आलेल्या सामन्यातील हा प्रसंग सांगितला. धोनीची खेळाविषयीची समर्पकता आणि कर्तव्यनिष्ठपणा याबाबत त्यांनी कौतुक केलं.
रात्री उशीरापर्यंत सराव करताना धोनीने वजनदार वस्तू उचलली आणि अचानक त्याच्या पाठीत त्रास झाला. त्यामुळे तो त्या वस्तूसह खाली कोसळला. सुदैवाने ती वस्तू त्याच्या अंगावर पडली नाही. त्याला चालताही येत नव्हतं. स्ट्रेचरवर बाहेर आणण्यात आलं, अशी माहिती एमएसके प्रसाद यांनी दिली.
''या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी धोनीच्या रुममध्ये गेलो. पण कसलीही चिंता करु नका, असं त्याने सांगितलं. एवढंच नाही, तर माध्यमांना उत्तर काय द्यायचं हे देखील मी धोनीकडून विचारुन घेतलं. पण तो पुन्हा म्हणाला की 'चिंता करु नका'. धोनीच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायचा नव्हता, त्यामुळे पर्यायी खेळाडू म्हणून पार्थिव पटेलला बोलावण्यात आलं होतं. मात्र आपण खेळण्यासाठी सज्ज असल्याचं धोनीने सांगितलं, अशी माहिती एमएसके प्रसाद यांनी दिली.
''दुपारनंतर अंतिम 11 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आणि धोनीही खेळण्यासाठी तयार झाला. त्याने मला त्याच्या रुममध्ये बोलावलं आणि तुम्ही एवढी चिंता का करत आहात, असं विचारलं. त्यानंतर तो म्हणाला की तुम्ही चिंता करु नका, माझा पाय तुटला असता तरी मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो असतो'', अशी माहिती एमएसके प्रसाद यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement