(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महेंद्रसिंह धोनी लवकरच टीव्ही शो घेऊन येणार, लष्करी अधिकाऱ्यांच्या साहसी गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणार
महेंद्रसिंह धोनी या शोमध्ये एखादी भूमिका साकारणार की शो होस्ट करणार याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही मालिका भारतीय सशस्त्र दलाच्या खऱ्याखुऱ्या नायकांवर आधारित असणार आहे.
मुंबई : क्रिकेटचं मैदान गाजवत असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी छोट्या पडद्यावर पदार्पणाच्या तयारीत आहे. छोट्या पडद्यावर धोनी नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र जून 2020 पर्यंत हा नवीन शो ऑन एअर होणार असल्याची माहिती मिळत आहेत. सोनी टीव्हीवर हा शो प्रसारित होणार आहे. या नव्या प्रोजेक्टसाठी धोनीने 'स्टुडिओ नेक्स्ट'सोबत करार केला आहे.
महेंद्रसिंह धोनी या शोमध्ये एखाद्या भूमिकेत दिसणार की शो होस्ट करणार, याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा शो भारतीय सशस्त्र दलाच्या खऱ्याखुऱ्या नायकांवर आधारित असणार आहे. ज्या जवानांनी देशसेवा केली, ज्यांना परमवीर चक्र आणि अशोक चक्राने सन्मानित केलं आहे, अशा लष्करी अधिकाऱ्यांच्या साहसी गोष्टी धोनी प्रेक्षकांना सांगणार आहे.
धोनी या शोच्या माध्यमातून देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानांची माहिती लोकांना सांगणार आहे. या माध्यमातून देशसेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना चर्चेत आणण्याचा धोनीचा उद्देश आहे. सध्या या शोची स्क्रिप्ट तयार केली जात असून लवकरच या शोचं शूटिंगही सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वी धोनीच सोशल मीडियावर एक गाणं व्हायरल झालं होतं, ज्यामध्ये धोनी कुमार शानूचं 'जब कोई बात बिगड जाये' हे गाणं गाताना दिसत होता.
विश्वचषकानंतर संघाबाहेर असलेला धोनी सध्या टीम इंडियामध्ये कम बॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी धोनी जोरदार नेट प्रॅक्टिसही करत आहे. मात्र आता धोनी टीम इंडियामध्ये कम बॅक करणार का? हे 2020 च्या सुरुवातीला स्पष्ट होईल.