एक्स्प्लोर
‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर मुंबईत ‘महामुंबई कबड्डी लीग’
प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर खेळविल्या जाणाऱ्या महामुंबई कबड्डीच्या 6 संघांची निवडही 1200 खेळाडूंच्या चाचणी स्पर्धेतून केली गेली.
मुंबई : प्रो कबड्डीमुळे गल्लीबोळातली अस्सल मराठी कबड्डीला आता चांगले दिवस आले आहेत. कबड्डी खेळ ग्लॅमरस झाला आहे. या कबड्डी खेळात महाराष्ट्रातील तरुणांना संधी मिळावी, यासाठी मुंबईत ‘महामुंबई कबड्डी लीग’चं आयोजन करण्यात आले आहे.
उदयोन्मुख खेळाडूंच्या झंझावाती चढाया-पकडींचा खेळ येत्या 15 ते 21 जानेवारीदरम्यान अभिनव कलाक्रीडा अकादमी आणि ओएच मिडियाच्या आयोजनाखाली कांदिवलीच्या चारकोप येथील विशाल सह्याद्री क्रीडानगरीत पाहायला मिळेल. या दिमाखदार कबड्डीचा आवाज महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या साहाय्याने घुमणार आहे.
भारतात सर्वाधिक कबड्डी कुठे खेळली जाते ? हा प्रश्न कोणत्याही कबड्डीपटूला विचारलात तर त्याचे एकच उत्तर असेल. ते म्हणजे महाराष्ट्र. पण भारतीय संघात किंवा प्रो कबड्डीत सर्वाधिक खेळाडू कुणाचे खेळतात ? याचे उत्तर निश्चितच महाराष्ट्र नव्हे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे खेळाडू नेमके का मागे पडतात? की त्यांना न्याय मिळत नाही ? हल्ली असे प्रश्न वारंवार विचारले जातात. याचे उत्तरही शोधावयाचे आणि खेळाडूंना आपला दर्जा सिद्ध करण्याची संधी द्यावयाची असा दुहेरी उद्देश महामुंबई कबड्डीच्या आयोजनातून साध्य करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
महाराष्ट्रातील कबड्डीचा तांत्रिक पाया पक्का व्हावा यासाठी आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, अशी भूमिका अभिनव कला क्रीडा अकादमीचे सर्वेसर्वा अंकुश मोरे यांनी मांडली.
1200 खेळाडूंमधून संघांची निवड
प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर खेळविल्या जाणाऱ्या महामुंबई कबड्डीच्या 6 संघांची निवडही 1200 खेळाडूंच्या चाचणी स्पर्धेतून केली गेली. या चाचणीसाठी मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतून खेळाडू आले होते. त्यातून 100 खेळाडूंची निवड करण्यात आली असून आता त्यातूनच 12 खेळाडूंचे सहा संघ तयार केले जातील आणि उर्वरित खेळाडूंना राखीव ठेवले जाईल.
प्रत्येक संघात 9 स्थानिक आणि 3 अन्य जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करता येईल. प्रो कबड्डीप्रमाणे महामुंबई कबड्डीतही संघाचे मालक असतील. तेच खेळाडूंचा सर्व खर्च उचलतील. या स्पर्धेच्या तयारीसाठी 7 दिवसांचे सराव शिबीरही आयोजित केले जाणार असून या शिबीरात खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक कबड्डी दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीत खेळली जाणार असून एकूण 17 सामने खेळले जातील. गटात अव्वल राहणाऱ्या पहिल्या दोन संघांमध्ये महामुंबई कबड्डी लीगचा अंतिम सामना खेळला जाईल तर तिसऱ्या क्रमांकासाठी गटातील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये झुंज रंगेल.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या कबड्डीच्या धमाक्यात खेळाडूंना त्यांच्या पात्रतेनूसार मानधन दिले जाणार आहे. तसेच विजेत्याला एक लाखांच्या रोख पुरस्काराने गौरविले जाईल. उपविजेता संघ पाऊण लाख रूपयांचे इनाम मिळवेल. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना दुचाकीने सन्मानित केले जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement