एक्स्प्लोर
विराट कोहलीच्या कार्यक्रमात विजय मल्ल्याची हजेरी!
लंडन : भारतातील बँकांना तब्बल नऊ हजार कोटींना चुना लावून पळ काढलेला उद्योजक विजय मल्ल्या लंडनमध्ये बिनधास्त फिरत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चॅरिटी कार्यक्रमात विजय मल्ल्याने हजेरी लावली.
मानवी तस्करी रोखण्यासाठी काम करणाऱ्या जस्टिस अँड केअर या संघटनेतर्फे रविवारी लंडनच्या एसएसी मैदानात विराट कोहलीच्या उपस्थितीत एका चॅरिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला टीम इंडियाच्या खेळाडूंसह अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात विजय मल्ल्याही उपस्थित होता.
या चॅरिटी कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विजय मल्ल्या काळ्या रंगाच्या गाडीतून उतरुन कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना दिसत आहे.
मात्र विजय मल्ल्या चॅरिटी कार्यक्रमात पोहोचल्यानंतर उपस्थित खेळाडूंनी तिथून काढता पाय घेतला. कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांनीही मल्ल्याला आपल्यापासून दूर कसं ठेवता येईल, याची दक्षता घेतली.
तसंच या कार्यक्रमातून अवघ्या अर्ध्या तासात काढता पाय घेऊन त्यांनी आपण कोणत्या वादात अडकणार नाही, याचीही खबरदारी घेतली. विजय मल्ल्या तिथे आल्यानंतर, कोणालाही त्याच्यासोबत फ्रेममध्ये यायचं नव्हतं. जर कोणी मल्ल्यासोबत आपला फोटो क्लिक केला तर अडचणीत येऊ, अशी भीती खेळाडूंच्या मनात होती.
बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीनं विजय मल्ल्याला आमंत्रण दिलं नव्हतं. पण चॅरिटी डिनरचं अख्खं टेबल बुक करणाऱ्या असामीने मल्ल्याला आमंत्रित केलं असण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.
कर्जबुडव्या विजय मल्ल्याची भारत-पाक सामन्याला उपस्थिती
विशेष म्हणजे याआधी एजबस्टनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानही स्टेडियममध्ये विजय मल्ल्या हजर होता. मल्ल्या सामना पाहत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आता विजय मल्ल्याने विराट कोहलीच्या कार्यक्रमाला जाहीरपणे हजेरी लावल्याने बीसीसीआयची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याने 15 महिन्यांपूर्वी भारत सोडून लंडनला पळ काढला होता. भारताने यंदा 8 फेब्रुवारी रोजी ब्रिटनकडे विजय मल्ल्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. ही याचिका मार्चमध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे पाठवली होती.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement