Thomas Cup 2022 : भारतानं 73 वर्षानंतर जिंकलेला थॉमस कप आहे तरी काय?
सर्वाधिक म्हणजेच 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाला भारतानं अंतिम सामन्यात मात दिली आणि इतिहास रचला. तर नेमका हा थॉमस कप आहे तरी काय आणि याला बॅडमिंटन विश्वात इतका मान का आहे, ते पाहूया...
India Win Thomas Cup 2022 : जवळपास सर्वच भारतीय बालपणीपासून बॅडमिंटन हा खेळ खेळतच असतात. अगदी मुलं-मुली दोघंही हा खेळ खेळताना दिसत असतात. पण याच खेळाची एक भव्य स्पर्धा असणाऱ्या थॉमस कपमध्ये (Thomas Cup) मात्र भारताला आजवर विजय मिळवणं दूरचं अंतिम सामन्यातही पोहोचता आलं नव्हतं. पण यंदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचत चषकावर भारतीय संघानं नावं कोरलं आहे. लक्ष्य सेन, किंदम्बी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीचे तर सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीचे सामने जिंकत भारताला 5 पैकी 3 सामने जिंकवून देत विजय मिळवून दिला आहे. तब्बल 73 वर्षानंतर भारताने उंचावलेला हा थॉमस कप (Thomas Cup) नेमका आहे तरी काय जाणून घेऊ...
अनेक प्रसिद्ध खेळांचा जन्म इंग्लंडमध्येच झाला असून या प्रसिद्ध अशा थॉमस कपची सुरुवातही इंग्लंडच्याच एका खेळाडूने केली. 19 व्या दशकाच्या सुरुवातीस इंग्लंडचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सर जॉर्ज एलन थॉमस यांनी या स्पर्धेची सुरुवात केली. फुटबॉल या सर्वात जुन्या खेळाची ज्याप्रमाणे विश्वचषक स्पर्धा होत होती, तशीच स्पर्धा बॅडमिंटनची देखील व्हावी असाच थॉमस यांना निर्धार असावा. त्या अनुषंघाने या स्पर्धेची सुरुवात झाली. 1948-49 मध्ये सर्वात आधी ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. आधी दर तीन वर्षांनी होणारी ही स्पर्धा नंतर मात्र दर दोन वर्षांनी होऊ लागली. 1982 साली स्पर्धेच्या नियमांत झालेल्या बदलानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
आशियाई देशांची हवा
तर इंग्लंडच्या भूमीत जन्माला आलेल्या या खेळामध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) या अधिकृत बॅडमिंटन फेडरेशनमध्ये असणारे सर्वच देश सहभाग घेत असतात. दरम्यान स्पर्धेची सुरुवात झालेल्या पहिल्याच वर्षी आशियाई देश मलेशियाने डेन्मार्कला अंतिम सामन्यात 8-1 ने मात देत कप नावे केला होता. पहिल्याच वर्षी आशियाई संघाने विजय मिळवला, ज्यानंतर पुढील अनेक वर्षे ही स्पर्धा आशियात होऊ लागली. सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया अशा ठिकाणी ही स्पर्धा पार पडत होती. पहिली तीन वर्षे मलेशियाने स्पर्धा जिंकल्यानंतर मग इंडोनेशियाने काही वर्ष अधिराज्य गाजवलं. 1982 मध्ये स्पर्धा लंडनमध्ये झाली आणि चीनने विजय मिळवत इंडोनेशिया आणि मलेशिया या दोघांशिवाय तिसऱ्या संघाने विजय मिळवल्याची घटना घडली. त्यानंतर चीन, मलेशिया, इंडोनेशिया हेच संघ विजय मिळवताना दिसत आहे. केवळ 2014 साली जपानने तर 2016 साली डेन्मार्कने हा सामना जिंकला होता. विशेष म्हणजे डेन्मार्क हा ही स्पर्धा जिंकणारा एकमेव असा देश आहे जो आशिया खंडातील नाही आहे.
भारताचा पहिला वहिला विजय
आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार भारत जगातील सहावा देश बनला आहे. यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.
यावेळी सर्वात आधी स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकाने मात देत सामना आणि कप भारताच्या नावे केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- India Wins Thomas Cup 2022: ऐतिहासिक! थॉमस कपवर इतिहासात प्रथमच भारतानं कोरलं नाव, पहिले तीन सामने जिंकत मिळवला विजय
- Thomas Cup 2022: थॉमस कपमध्ये भारताला आणखी एक यश, पुरुष दुहेरीत 2-0 ने विजय
- Lakshya Sen Wins : थॉमस कपमध्ये भारत इतिहास रचण्याच्या तयारीत, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनकडून इंडोनेशियन खेळाडूचा पराभव