क्लासेन लढला, नडला, पहाडासारखा उभा राहिला, मात्र किंग खानची KKR च बाजीगर!
KKR vs SRH : ईडन गार्डन मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात कोलकात्यानं (KKR) हैदराबादचा (SRH)चार धावांनी पराभव केले.
KKR vs SRH : ईडन गार्डन मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात कोलकात्यानं (KKR) हैदराबादचा (SRH)चार धावांनी पराभव केले. कोलकात्यानं दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनं 204 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन एकटाच लढला. त्यानं कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मिचेल स्टार्क याचाही समाचार घेतला, पण अखेरीस हर्षित राणानं सामना फिरवला. क्लासेन यानं 29 चेंडूत 63 धावांची झंझावती खेळी केली. या विजयासह कोलकात्यानं आयपीएल 2024 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली आहे. हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागलाय.
कोलकात्यानं दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनं ठरावीक अंतरानं विकेट फेकल्या. पण अखेरीस क्लासेन यानं वादळी फलंदाजी करत सामन्यात रंगत वाढवली होती. क्लासेन यानं अखेरच्या पाच षटकात धावांचा पाऊस पाडला. क्लासेन याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही, त्यामुळेच अखेरच्या षटकात हैदराबादचा पराभव झाला.
क्लासेनची खेळी व्यर्थ -
209 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादसाठी मयंक अगरवाल आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार सलामी दिली. या दोघांनी धावांचा पाऊस पाडला. पॉवरप्लेमध्येच 60 धावांचा पल्ला पार केला होता. पण 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाज दबावात आले अन् एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. मयांक आणि अभिषेक यांनी प्रत्येकी 32 धावांचं योगदान दिले. राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांना मोठी खेळी करता आली नाही. त्याशिवाय इतर फलंदाजही अपयशी ठरले. अब्दुल समद आणि शाहबाज अहमद यांनी संघर्ष केला, पण मोठी खेळी करता आली नाही. मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या. एकीकडे विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला क्लासेन यानं आपलं काम चोख बजावलं. क्लासेन यानं फक्त 29 चेंडूत 63 धावांचा पाऊस पाडला. क्लासेन यानं आपल्या खेळीत आठ षटकार लगावले. क्लासेनशिवाय अब्दुल समद यानं एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावा केल्या. शाहबाज अहमद यानं 2 षटकार आणि एक चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. क्लासेन यानं एकट्यानं लढा दिला, पण विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले.
कोलकात्याकडून मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती सर्वात महागडा गोलंदाज ठरले. दोघांनी चार षटकात 50 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. मिचेल स्टार्क याला तर एकही विकेट मिळवता आली नाही. वरुण चक्रवर्ती यानं 55 धावा खर्च करत एक विकेट घेतली. आंद्रे रसेल यानं दोन विकेट घेतल्या. तर हर्षित राणा यानं एक विकेट घेतली.