(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs RCB: श्रेयस अय्यरची आयडिया, सॉल्टची साथ ठरली गेमचेंजर, एका ट्रिकमुळं कोलकाताचा विजय अन् आरसीबीला पराभवाचा धक्का
IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात काल झालेली मॅच अखेरच्या ओव्हरपर्यंत गेली. अखेरच्या ओव्हरमध्ये बंगळुरुला पराभवाचा धक्का बसला.
कोलकाता : कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) अखेरच्या बॉलवर विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) ला शेवटच्या बॉलवर विजयासाठी तीन धावांची गरज होती. या बॉलपूर्वी कर्ण शर्माचं वादळ त्या ओव्हरमध्ये कोलकाताच्या टीमनं अनुभवलं होतं. कर्ण शर्मानं मिशेल स्टार्कला तीन सिक्स मारुन आरसीबीला विजयाच्या जवळ पोहोचवलं होतं. शेवटचा बॉल टाकण्यापूर्वी केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं सर्व खेळाडूंना एक सूचना केली होती. या सूचनेमुळं आणि फिल सॉल्टच्या तत्परतेनं कोलकाताला विजय मिळाला.
श्रेयस अय्यरनं काय म्हटलं?
कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यातील मॅचचा निकाल अखेरच्या ओव्हरपर्यंत लांबला होता. आरसीबीला शेवटच्या बॉलवर तीन रन हव्या होत्या. मिशेल स्टार्कनं ओव्हरमध्ये 18 धावा देत 1 विकेट घेतली होती. श्रेयस अय्यरनं अखेरच्या बॉलसाठी विशेष गेमप्लान केला होता. मॅचनंतर त्यानं याबद्दल माहिती दिली होती. शेवटच्या बॉलवर आरसीबीच्या फलंदाजांनी कुठेही बॉल मारला तरी तो सर्व खेळाडूंनी विकेट कीपर फिलीप सॉल्टच्या दिशेनं टाकायचा.
फिलीप सॉल्टची अफलातून विकेट कीपिंग
आरसीबीच्या फलंदाजांनं शेवटच्या बॉलवर शॉट मारुन दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. दुसरी रन पूर्ण करत असताना केकेआरच्या खेळाडूनं बॉल फिल सॉल्टच्या दिशेनं टाकला आणि त्याच तत्परतेनं फिल सॉल्टनं केकेआरच्या खेळाडूला रनआऊट केलं. यामुळं सुपर ओव्हरचं संकट देखील टळलं.
आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता.केकेआरनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 222 धावा केल्या होत्या.
आरसीबीच्या टीमला 20 ओव्हरमध्ये 221 धावा करता आल्या. केकेआरनं एका रननं विजय मिळवला आणि आरसीबीच्या पराभवाची मालिका सुरु राहिली. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सनं स्पर्धेतील पाचवा विजय मिळवत दोन गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा फलंदाजी केली त्यावेळी फिल सॉल्टनं आक्रमक सुरुवात केली होती. फिल सॉल्टनं 14 बॉलमध्ये 48 धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या 50 धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरनं 222 धावांचा टप्पा पार केला होता. तर, आरसीबीकडून रजत पाटीदार आणि विल जॅक्सनं अर्धशतकं केली मात्र ते संघाला विजयापर्यंत पोहोचवू शकले नाहीत.
संबंधित बातम्या :
राजस्थान रॉयल्स मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचवर पावसाचं संकट? जाणून घ्या जयपूरचं वातावरण कसं असेल?
छातीठोकपणे सांगतो, विराट कोहलीला आऊट देणं चुकीचं, नवज्योत सिद्धूचं रोखठोक भाष्य