IPL 2023 : पराभवानंतर खेळाडूंवर भडकला कर्णधार विराट कोहली, 'आम्हाला यश मिळणं अपेक्षितच नव्हतं, कारण...'
RCB vs KKR : आरसीबीची कर्णधार विराट कोहली म्हणाला की, आम्ही हरण्यासाठी पात्र आहोत. आम्ही विरोधी संघाला विजयाची संधी दिली, आम्ही अपेक्षेप्रमाणे खेळलो नाही.
RCB vs KKR, Virat Kohli : आयपीएल (IPL 2023) च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) 21 धावांनी पराभव केला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीने नाणेफेक जिंकली आणि संघ गोलंदाजीसाठी उतरला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 200 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरू संघाला 20 षटकांत आठ गडी गमावून 179 धावा करता आल्या. कर्णधार विराट कोहलीने 37 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. दरम्यान, कोहलीची ही खेळी व्यर्थ ठरली. सामन्यातील परभावानंतर कोहलीने प्रतिक्रिया देताना निराशा व्यक्त केली.
Virat Kohli in IPL 2023 : 'आम्ही हरण्यासाठी पात्र आहोत'
कोहली यावेळी म्हणाला की, ''आम्ही सामन्यात अपेक्षेप्रमाणे चांगला खेळ केला नाही. त्यामुळे आम्ही हरण्यासाठी पात्र आहोत. आम्ही विरोधी संघाला विजयाची संधी दिली. आमच्या संघाला सामन्यात मिळालेल्या संधींचा फायदा घेता आला नाही. आम्ही अनेक सोपे झेल सोडले, ते आम्हाला महागात पडले. यामुळे आम्हाला आणखी 25-30 धावांचा पाठलाग करावा लागला. याशिवाय आमचे फलंदाज सतत बाद होत राहिल्या त्यामुळे आम्हांला लक्ष्य गाठता आलं नाही. केवळ एका चांगल्या भागीदारीमुळे सामन्याचा मार्ग बदलता आला असता, पण तसं झालं नाही.''
We know what we can achieve as a team 👊
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 26, 2023
Looking ahead to the away leg 🛣️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvKKR pic.twitter.com/gjFoGDqdWS
सलग चार सामने गमावल्यानंतर कोलकाताने पहिला जिंकला
कोलकाता संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर पहिला सामना जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दोन विजयानंतर पराभूत झाला. केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या आठ पैकी सामन्यांत तीन विजय मिळवला असून पाच सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीचा संघ आठ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
कोलकाताकडून आरसीबीचा पराभव
कोलकाता संघाने आरसीबीला 200 धावांचं लक्ष्य दिलं. केकेआरकडून जेसन रॉयने 29 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार नितीश राणाने 21 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. बंगळुरुकडून कोहलीने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. महिपाल लोरमोरनं 34 तर दिनेश कार्तिकने 22 धावांची खेळी केली. इतर खेळाडूंनी निराशा केली. डु प्लेसिस 17 धावांवर तर ग्लेन मॅक्सवेल 5 धावांवर बाद झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :